मुंबई – टीम न्यू महाराष्ट्र
विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम
31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरणार
10 जून रोजी अर्जाची छाननी
12 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
26 जून रोजी मतदान होणार
1 जुलै रोजी होणार मतमोजणी