महावितरणने रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

ससून रुग्णालयाच्या सादाला प्रतिसाद देत गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध होण्यासाठी महावितरणच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ६ ते ८ जूनपर्यंत पुणे परिमंडलामध्ये विभागनिहाय रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये २१८ महिला व पुरुष अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

दरम्यान, वर्धापनदिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मंडलस्तरावर चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (गणेशखिंड मंडल), वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन (रास्तापेठ मंडल) आणि राजगुरुनगर येथील कृष्णपिंगाक्ष प्रिमियम लॉन्स (पुणे ग्रामीण मंडल) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऐरवी धकाधकीच्या वीजक्षेत्रात अविश्रांत ग्राहकसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबिय व बालगोपाळांना विविध कार्यक्रमांतून नवी ऊर्जा मिळाली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, अमित कुलकर्णी, संजीव नेहते, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, बालकांसाठी विविध स्पर्धा, जादूचे प्रयोग, संगीतरजनी आदी कार्यक्रम उत्साहात झाले. तसेच महावितरणमध्ये कार्यरत अभियंता, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चित्रपट व भावगीत, शास्त्रीय नृत्य, पोवाडे आदींचे सादरीकरण करीत वाहव्वा मिळविली. तर १२ विभागांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत मंचर विभागाने विजेते तर राजगुरुनगर विभागाने उपविजेतेपद मिळविले.

प्रादेशिक संचालक अंकुश नाळे व मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडापटूंचा गौरव करण्यात आला व विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात आली. राष्ट्रीय स्पर्धेतील सूवर्णपदक विजेती वैष्णवी गांगरकर (बॅडमिंटन), उपविजेत्या संघाचा कर्णधार अमित जाधव (कबड्डी), कांस्यपदक विजेत्या संघातील अतुल दंडवते (टेबल टेनिस), कॅरमपटू गणेश कस्तुरे, धावपटू गुलाबसिंग वसावे, मॅरेथॉन धावपटू प्रशांत नाईक यांच्यासह विभागनिहाय क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज प्रेम नायडू, गोलंदाज- दिलीप सोळंकी, स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू विकास काळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सतीश केदार, संतोष गहेरवार, भक्ती जोशी, ऐश्वर्या वस्त्रद यांनी केले.

Share

Leave a Reply