पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या श्री.सयाजीनाथ महाराज विद्यालयात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी योग अभ्यासाचे धडे गिरविले.
यानिमित्ताने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड क्रीडा विभागाचे योग प्रशिक्षक दत्तात्रय तापकीर यांनी कपालभाती, प्राणायाम, अनुलोम-विलोम ,भ्रमरी आदी योगासनाचे धडे दिले. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये सर्व विद्यार्थ्यां आणि शिक्षकांमध्ये उत्साह संचारला होता. विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योगासनाचे धडे घेतले. आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी ठेवण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी योगासने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज योगासने करावीत असे प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे , शालेय समिती अध्यक्षा प्रा. अलका पाटील , संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.