पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांची संयुक्त बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिकेतर्फे उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली. औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देण्याकरीता अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, तृप्ती सांडभोर, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, निळखंड पोमण (मुख्याधिकारी माहिती व तंत्रज्ञान विभाग, CSR व उद्योग सुविधा कक्ष), दिपक पवार (माहिती व तंत्रज्ञान अधिकारी) CSR व उद्योग सुविधा कक्षाचे विजय वावरे व श्रुतिका मुंगी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘उद्योग सुविधा कक्ष’ हा स्थानिक उद्योग व प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरेल. या उपक्रमामुळे गुंतवणूकदारांना पारदर्शक व वेगवान सेवा मिळेल आणि व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल. महानगरपालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधून औद्योगिक अडचणी सोडवण्यासाठी हा कक्ष प्रभावी भूमिका बजावेल.
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या, “उद्योग सुविधा कक्ष’ आणि ‘उद्योग-सारथी’ पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल यंत्रणेद्वारे उद्योगांसाठी सुलभ आणि पारदर्शक सेवा पुरवली जात आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे उद्योजकांना परवाने, परवानग्या व इतर सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील, तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट संवादाची संधी देखील उपलब्ध होईल. अशाप्रकारे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय सुलभतेसाठी महापालिका अधिकाधिक सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
अतिरिक्त आयुक्त निळकंठ कोमल यांनी या कक्षाच्या माध्यमातून राबवले जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्थानिक उद्योग सहभाग आणि सीएसआर उपक्रम राबविणे तसेच उद्योग कामगार आणि उद्योजकांसाठी शासकीय कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास यासंदर्भात माहिती व सुविधा उपलब्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
उद्योग सुविधा कक्ष आणि उद्योग सारथी या संकल्पनेचे सादरीकरण करताना, पुढील काळात संकल्पनेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या साठी विवीध उद्योग संस्था – संघटना उद्योजक प्रतिनिधी यांच्या बैठका आयोजित करण्यात येतील, अशी माहिती या कक्षाचे संचालक विजय वावरे यांनी दिली व जास्तीत जास्त उद्योग प्रतिनिधींनी उदोघ सारथी पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन केले.
यावेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मोठ्या संख्येने उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते अनेक उद्योजकांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडल्या. त्यावर महानगरपालिकेतर्फे समाधानकारक उत्तरे देण्यात आली. पुढील काळात वेळोवेळी उद्योजक प्रतिनिधींबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले.
महापालिकेने उद्योजकांच्या तक्रारींबाबत गुप्तता पाळावी
फोरम ऑफ स्मॉल केली इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी असोसिएशनच्या मागणीनुसार हा सुविधा कक्ष निर्माण करण्यात आल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार मानले. उद्योजकांनी या पोर्टलचा लाभ घेऊन आपल्या परिसरातील समस्या महानगरपालिकेपर्यंत मांडाव्यात आणि महानगरपालिकेने तत्परतेने या समस्या सोडविण्यात पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले. तसेच महानगरपालिकेने संबंधित पोर्टलमध्ये येणाऱ्या तक्रारी ह्या गुप्त असाव्यात यासाठी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.