चिंचवडमधून निवडणूक लढविण्यावर नाना काटे ठाम !

तुतारी हाती घेणार का ? शहरभर एकच चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला तुझ्यापद्धतीने कामाला लाग असे सांगितले होते. जागावाटपाबाबत अद्याप धोरण ठरले आहे, असे नाही. चिंचवडची जागा कोणत्याही पक्षाला दिली असे, निश्चित झालेले नाही. ही जागा घड्याळाला मिळाली नाही, तरी मी निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक मी अपक्ष नाही, चिन्हावर लढणार आहे.असे वक्तव्य करून माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी राजकीय धमाका केला आहे. त्यामुळे आता नाना काटे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा आहे .

नाना काटे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून प्रसिद्ध आहेत. २०२३ च्या पोट निवडणुकीत नाना काटे यांना ९९ हजार मतदान झाले होते, चिंचवडच्या मतदारांनी नाना काटे यांना भरघोस मतदान केले होते परंतु त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना लाख छत्तीस हजार मतदान मिळाले व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 47 हजार मतदान मिळाले होते या निवडणुकीत नाना काटे यांना पराभव स्वीकारावा लागला. नंतरच्या काळात अजित पवार यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली व महायुतीत सत्तेत सहभागी झाले .

परंतु, आता दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जागा सुटत नसल्याने विठ्ठल उर्फ नाना काटे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत तसे संकेतही नाना काटे यांनी मागील काही दिवसात दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, अजित पवार यांनीसुद्धा नाना काटे यांना कामाला लागण्याची सूचना केली आहे. मध्यंतरी युवा नेते पार्थ पवार यांनीही नाना काटेच आमदार होतील, असा दावा केला होता. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी दोन्ही बाजुंनी नाना काटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

Share

Leave a Reply