पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
शहरातील स्थानिक खेळाडुंना कुस्ती, कबड्डी, धनुर्विद्या, नेमबाजी यासह रोविंग, स्केटिंग, बॉक्सिंग अशा नव्या युगातील खेळांमध्ये चमकदार कामगिरी करता येईल, अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहरात ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
आमदार महेश लांडगे यांनी ‘‘स्पोर्ट्स सिटी पिंपरी-चिंचवड’’ या संकल्पनेसंदर्भात पिंपरी-चिंचवडकरांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी गेल्या १० वर्षांत त्यांनी उभारलेले महत्त्वाकांक्षी क्रीडा प्रकल्प आणि विकासकामांचा लेखाजोखा मांडला.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक खेळाडुंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात. या करिता आम्ही ‘‘स्पोर्ट्स सिटी- पिंपरी-चिंचवड’’ असा संकल्प केला होता. २०१७ मध्ये सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमताने काम करण्याची संधी दिली. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने वाव मिळाला. तत्पूर्वी, स्थायी समितीचा सभापती म्हणून काम करताना महानगरपालिका प्रशासनाचे राज्यातील पहिले स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करुन आपण अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आदर्श निर्माण केला होता, ही बाब मला अभिमानाने नमूद करावी, असे वाटते.
देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य
आमदार लांडगे म्हणाले की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारच्या सहकार्याने व महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. कै. पै. मारुतीराव रावजी लांडगे यांच्या नावाने सुरू केलेल्या या संकुलामध्ये नामवंत पैलवान नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाने सध्या ७० कुस्तीपटू सराव करीत आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय स्केटिंग ग्राउंड, आंतरराष्ट्रीय रोविंग सेंटर, धनुर्विद्या (आर्चरी) प्रशिक्षण केंद्र, राष्ट्रीय रायफल व पिस्तुल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र, लॉन टेनिस कोर्ट, विविध व्यायामशाळा, विविध जलतरण तलावांचे काम गेल्या १० वर्षांध्ये पूर्ण केले. आपल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्रामध्ये जगविख्यात ‘‘प्रो-कबड्डी’’ स्पर्धेतील खेळाडूंनी सराव केला.
पिंपरी-चिंचवड शहराला ‘‘स्पोर्ट्स सिटी’’ घडवण्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी क्रीडा प्रकल्प उभारले आहेत. आगामी काळात मोशी येथे आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय स्टेडिअम, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, क्रिकेट ॲकॅडमींना प्रोत्साहन देण्यासह पुण्यातील डेक्कन जिमखानाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब सुरू करण्याबाबत मी पाठपुरावा करीत आहे. आपल्या शहरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धासह ऑलिंपिक विजेते खेळाडू घडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. शहराला ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जावर ओळख निर्माण करुन देण्यासाठी आणि शहराच्या क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी जिद्दीने काम करीत आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.