पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे तब्बल १८ दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. ११ जून ते २८ जून या कालावधीत त्यांनी रजा घेतली आहे. त्यांच्या रजेच्या कालावधीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश महाराष्ट्र राज्याचे कार्यासन अधिकारी शिवाजी बा. चव्हाण यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ११ ते २८ जूनपर्यंत रजा मागितली होती. त्यांच्या या अर्जित रजेस सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. शेखर सिंह यांच्या रजा कालावधीचा आयुक्त राहुल महिवाल स्वतःकडील कार्यभार सांभाळून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त या पदाची जबाबदारी सांभाळायची आहे. शेखर सिंह हे रजेवरून परत आल्यावर राहुल महिवाल यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार आपोआप संपुष्टात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. तेव्हापासून प्रशासक महापालिकेचा कारभार पाहत आहेत. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे. अशातच नुकतीच लोकसभा निवडणुक देखील पार पडली, याकालावधीत सुरू असलेल्या आचारसंहितेचा फटका देखील कामांना बसला आहे. आता ऐन पावसाळ्यात प्रभारी आयुक्त तब्बल १८ दिवस कारभार पाहणार आहेत.