पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
शहरातील नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ‘हयातीचा दाखला’ आवश्यक असतो. मनपा हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या ‘हयात दाखल्या’बाबत त्यांचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात आले असून ६६९९ दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे.
दिव्यांगाच्या हयातीच्या दाखल्यामध्ये बदल, दुरुस्ती करण्यासाठी कार्यालयामध्ये न येता त्यांच्या दाखल्यामध्ये मनपा प्रशासनाकडून ‘घरोघरी’ जाऊन नोंदणी करण्यात आली. दिव्यांगाच्या हयातीच्या दाखल्याचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली व भारतातील अग्रगण्य महानगरपालिका ठरली आहे.
दिव्यांगाच्या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरामध्ये ६६९९ मधील ५२३२ जणांकडे म्हणजेच ७८ टक्के दिव्यांगांकडे यूडीआयडी सर्टिफिकेट असून १४६७ म्हणजेच २२ टक्के दिव्यांगांकडे हयातीचा दाखला नसल्याचे निदर्शनास आले; परंतु सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आता १४६७ जणांचा हयातीचा दाखला काढण्यासाठी मदत होणार आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरामध्ये दिव्यांगामध्ये ४५४० इतके दिव्यांग पुरुष तर २१५९ इतक्या दिव्यांग महिला आहेत. याचबरोबर, सर्वेक्षणाच्या माध्यमातून वय-वर्षे २५ ते ६० यामध्ये दिव्यांगाची संख्या जास्त असल्याचे आढळले आहे.
घरोघरी जाऊन दिव्यांगाचे सर्वेक्षण करणारी राज्यातील पहिली मनपा
शहरातील दिव्यांग व्यक्तींना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांचा हयातीचा दाखला महतत्त्वाचा असून, शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिव्यांगांची माहिती अपडेट करण्यात आली. यामुळे भविष्यात दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नसून, त्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन दिव्यांगाचे समक्ष सर्वेक्षण करणारी राज्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका पहिली असल्याने त्याचा अभिमान आहे.
शेखर सिंह,
आयुक्त तथा प्रशासक,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका