गावात आलेल्या संशयितांबाबत पोलिसांना माहिती द्यावी ः गणेश बिरादार

इंदापूर ः टीम न्यू महाराष्ट्र 

ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना प्रशिक्षण द्या. म्हणजे कसे बोलावे, कसे राहावे, ड्रेस, लाठी, शिट्टीचा वापर चांगल्या कामासाठी करा. रात्रगस्त, पालखी सोहळा, गणपती बंदोबस्त, गावची जत्रा अशा वेळी पोलिसांना मदत करावी. गावामध्ये बाहेरून येणारी वाहने, संशयित व्यक्ती यांची विचारपूस केली पाहिजे. काही संशयत दिसल्यास पोलिसांना तात्काळ फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले. 

वालचंद नगर पोलीस स्टेशन यांच्वयातीने नुकत्याच आयोजित केलेल्या  ग्राम सुरक्षा दल मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  वालचंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत ३९ गावे १३ वाड्या वस्त्या अशी एकूण ५२ गावांमधील ग्रामसुरक्षा दल सदस्य २३३ जवानांची गाव पातळीवर निवड करून त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार  तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी  डॉ. सुदर्शन राठोड यांच्या हस्ते  ड्रेस, लाठी, शिट्टी या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.  तसेच ३९ गावांमधील  विशेष कामगिरी केलेल्या पोलिस पाटलांसह   महिला दक्षता कमिटी सदस्यांचा वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.

डॉ. सुदर्शन राठोड म्हणाले, ग्राम सुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून अधिक अधिक युवकांनी ग्रामसुरक्षा दलात सहभागी व्हावे. पोलिसांचे संख्या बळ विचारात घेता पोलीस सर्वच ठिकाणी जाऊ शकतील असे नाही. त्यामुळे मदतीसाठी ग्रामसुरक्षा दलातील जवान असणे गरजेचे बनले आहे. ग्रामसुरक्षा दलातील जवानांनी चांगले काम केले तर पोलीस स्टेशन कडून सन्मान होत असतो. त्याचा फायदा पोलीस भरतीसाठी होत असतो. आपल्याला एक शिस्त वेगळीच लागते.

पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी प्रास्ताविक केले.  आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी मानले. यावेळी मिलिंद मिठ्ठापल्ली पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस स्टाफ, ग्रामसुरक्षा दलातील सदस्य, महिला दक्षता समिती, पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समजूतदार  महिलांमुळे घरगुती वादांना आळा बसेल

अँड. विशाल बर्गे म्हणाले की, सतर्क आणि जागरूक नागरिक असतील तर गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल. प्रत्येक नागरिकाला गुन्ह्याला प्रतिबंध करायचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. अँड सुप्रिया विशाल बर्गे म्हणाल्या, महिला सजग समजूतदार असतील तर घराघरात होणारे वाद, भांडणे त्या थांबवू शकतील.

Share

Leave a Reply