चाकण ; टीम न्यू महाराष्ट्र :
महापारेषण कंपनीच्या आळेफाटा 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकण परिसरातील 12 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी (दि. 23) सकाळी तीन तास खंडित होता. मात्र महापारेषणकडून युद्धपातळीवर उपाययोजना करून चिंचवड 220 केव्ही उपकेंद्रातून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, चाकण परिसरातील वाकी, बिरदवडी, रोहकल, कडाची वाडी, रासे, रहाणुबाई मळा, मेदनकरवाडी या परिसराला महावितरणच्या आंबेठाण व फोक्सवॅगन 22 केव्ही या दोन वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होतो. मात्र महापारेषणच्या आळेफाटा 220 केव्ही उपकेंद्रातील इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये (आयसीटी) बिघाड झाल्यामुळे सोमवारी (दि. 23) सकाळी 8.15 वाजता या दोन्ही वीजवाहिन्यांवरील सुमारे 12 हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
तथापि हा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे लक्षात येताच महापारेषणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. यामध्ये सकाळी 11.15 वाजता चिंचवड 220 केव्ही उपकेंद्रातील पर्यायी व्यवस्थेतून महावितरणच्या आंबेठाण व फोक्सवॅगन 22 केव्ही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, महापारेषणकडून नादुरुस्त झालेले इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आहे.