पिंपरी, तळेगाव, चाकण परिसरात दीड तास वीजपुरवठा खंडित

पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी (दि. २६) पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, चाकण, तळेगाव, वडगाव, कामशेत, मरकळ, आकुर्डी या परिसरातील सुमारे १ लाख ३२ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १.४९ ते ३.३० या कालावधीत खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी की, तळेगाव येथील ‘पीजीसीआयएल’च्या अतिउच्चदाब ४०० केव्ही उपकेंद्रात आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही काठापूर, १३२ केव्ही सणसवाडी, १३२ केव्ही मरकळ, २२० केव्ही थेऊर, १३२ केव्ही यवत, १३२ केव्ही रहाटणी, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चिंचवड या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला.

परिणामी महावितरणच्या १८ उपकेंद्रांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. अतिउच्चदाबाच्या आठ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडल्याने तब्बल ५२३ मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली. त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव, सांगवी, आकुर्डी परिसर तसेच चाकण, कुरळी, नाणेकरवाडी, निघोजे, शेल पिंपळगाव, धावडी, तळेगाव, वडगाव, कामशेत शहर व परिसरातील सुमारे १ लाख ३२ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

त्यानंतर ‘पीजीसीआयएल’च्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना करून दीड तासांत पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून दिला व महापारेषणच्या अतिउच्चदाबाच्या व त्यानंतर महावितरणच्या उपकेंद्रांचा खंडित झालेला वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत झाला. ‘पीजीसीआयएल’च्या तळेगाव ४०० केव्ही उपकेंद्रातील बिघाड दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून महापारेषण कंपनीचे पुणे येथील एक पथक याकामी सहकार्य करीत आहे. आज रात्री उशिरापर्यंत उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Share

Leave a Reply