मुंबई ; टीम न्यू महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. हा पराभव देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना खूप जिव्हारी लागला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्लीतल्या पक्ष श्रेष्ठींकडे आपल्याला पक्ष संघटना वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती भर पत्रकार परिषदेत केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये मोठा भूकंप आला आहे. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली जात आहे. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजप नेते मोहित कंबोज यांनी थेट पक्षाच्या दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांना सवाल केले आहेत.
“भाजप महाराष्ट्र आणि भाजप मुंबई यांनी रिअॅलिटी चेक करण्याची गरज आहे. या संपूर्ण पराभवाची जबाबदारी कोणाची?”, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. “फक्त एका व्यक्तीची लाईन छोटी करण्याच्या चक्करमध्ये पक्षाचं नुकसान झालं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनीही पराभवात जबाबदारी निश्चित करावी”, असं मोहित कंबोज म्हणाले आहेत.
मोहित कंबोज नेमकं काय बोलले?
मोहित कंबोज म्हणाले . “फक्त एका व्यक्तीची लाईन छोटी करण्याच्या चक्करमध्ये पक्षाचं नुकसान झालं”, त्यांचं हे वक्तव्य कदाचित ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना फुटल्यानंतर लोकसभा निवडणूक ही पहिली मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालाय. त्यामुळेच मोहित कंबोज यांनी संबंधित व्यक्त केल्याची चर्चा आहे.
मंगलप्रभात लोढा यांचं फडणवीसांना आवाहन
दरम्यान, भाजपचे नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. “लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्राचे नेतृत्व केले, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपला मोठा आधार आहे. सध्याच्या राज्य सरकारमध्ये आपली महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या नेतृत्वात अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील हा पराजय आपल्या एकट्याची जबाबदारी नसून, आम्हा सर्वांची देखील आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण राजीनामा देऊ नये. सरकारमध्ये राहून आम्हा सर्वांचे मार्गदर्शन करावे आणि भाजपा कार्यकर्त्यांचे नेतृत्व करावे”, असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.