अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरु

नवी दिल्ली : टीम न्यू महाराष्ट्र

यावर्षी अमरनाथ यात्रा 29 जून पासून सुरु होणार आहे. ही यात्रा 52 दिवस चालणार असून 19 ऑगस्ट रोजी यात्रा समाप्त होईल. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी आवश्यक असते. या नोंदणीला आज (सोमवार, दि. 15) पासून सुरुवात झाली आहे.

गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, 6 महिन्यांच्या पुढील गर्भवती महिला, 13 वर्षांखालील लहान मुले, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक या यात्रेसाठी नोंदणी करू शकत नाहीत. भाविकांना श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या jksasb.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 100 रुपये शुल्क लागणार आहे. ऑफलाईन माध्यमातून देखील नोंदणी करता येईल. नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, 4 पासपोर्ट साईझ फोटो, सरकारी हॉस्पिटलचे (अधिकृत डॉक्टरांनी दिलेले) आरोग्य प्रमाणपत्र अशी कागदपत्रे नोंदणीसाठी लागतील.

बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये अमरनाथ गुहा असून ती जमिनीपासून तीन हजार 880 मीटर उंचीवर आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी जाताना आरामदायी कपडे, आरामदायी बूट, रेनकोट, वॉटरप्रूफ बॅग, अधिकचे कपडे, पाण्याची बॉटल, मॉईश्चरायझर क्रिम किंवा वॅसलीन, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, सुका खाऊ असा वस्तू सोबत असणं आवश्यक आहे. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी पोलीस आणि सेना दलांचे कॅम्प असणार आहेत. यात्रा मार्गावर भाविकांच्या खाण्या-पिण्याची सोय केलेली असते. तसेच विश्रांतीचीही ठिकाणे असतील. शॉर्टकट रस्त्याने प्रवास करू नये. सहप्रवासी हरवणार नाहीत याची काळजी घ्या. यासाठी सोबत प्रवास करा. सहप्रवासी हरवल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या. अशी काळजी घेऊन अमरनाथ यात्रा पूर्ण करता येईल.

बालटाल आणि पेहेलगाम अशा दोन मार्गांनी ही यात्रा पूर्ण करता येते. बालटाल येथून अमरनाथ गुहा 14 किलोमीटर अंतरावर आहे. हा मार्ग कठीण असल्याने अनेकजण पेहेलगाम मार्गाने अमरनाथ यात्रा करतात. हा मार्ग 36 किलोमीटरचा आहे.

Share

Leave a Reply