ऐश्वर्यम हमारा’ परिसरातील १५ हजार सदनिकाधारकांना दिलासा

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

रस्ता हस्तांतराच्या प्रक्रियेअभावी जागा उपलब्ध न झाल्यामुळे ऐश्वर्यम हमारा सोसायटी व परिसरातील सदनिकाधारकांना हक्काचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने या रस्त्याचा ताबा संबंधित विकसक यांनी महापालिका प्रशासनाला दिला. त्यामुळे सुमारे १५ हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

चिखली येथील गट नं. ९४ मध्ये ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मागील बाजूस असलेला रिव्हर लिगसी सोसायटीकडे जाणारा रस्ता संबंधित विकसकाच्या ताब्यात असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विकसित केला जात नव्हता. याबाबत सोसायटीधारकांनी चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनकडे मागणी केली होती. त्याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी ही बाब आमदार महेश लांडगे यांच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी ऐश्वर्यम हमारा प्रकल्पाचे विकसक सतीश अग्रवाल यांच्याशी बैठक केली. त्या बैठकीत तातडीने रस्ता हस्तांतरीत करावा आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले. त्याला विकसक अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या पार्श्वभूमीवर माजी महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे रस्ता हस्तांतराची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, निखील बोऱ्हाडे, सोसायटीचे चेअरमन निलेश खांडगे, सुजीत टेकवडे, सत्या त्रिपाटी, विलास घुले आदी उपस्थित होते.

…………………

भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये मोठे गृहप्रकल्प उभारले आहेत. २०१७ पासून या भागामध्ये पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे निर्माण करण्यासाठी चालना मिळाली. त्यामुळे ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी विकसक आणि सोसायटीधारकांमध्ये सकारात्मक समन्वयाअभावी काही प्रश्न आहेत. त्यामुळे सोसायटी फेडरेशनच्या समस्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असतो. ऐश्वर्यम हमारा विकसकाच्या सकारात्मक भूमिकेमुळे जागा हस्तांतरीत झाली. त्यामुळे सुमारे १५ हजार सोसायटीधारकांना हक्काचा रस्ता उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. याबद्दल महापालिका प्रशासन, सोसायटी फेडरेशन आणि विकसक यांचे आभार व्यक्त करतो.

Share

Leave a Reply