वाहतुकीला अडथळा ठरणारे मोशी, राजगुरुनगरचे टोलनाके हटवा : अभय भोर

 पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र

पुणे, पिंपरी चिचंवडकडून चाकण आणि राजगुरुनगरकडे जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांसह प्रवाशांना तसेच महामार्गालगतच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.  ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएसह अन्य प्रशासकीय यंत्रणांकडून महामार्गालगतच्या अवैध बांधकामांवर कारवाई केली जात आहे. मात्र, वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या मोशी आणि राजजगुरुनगरजवळील शिरोली टोलनाकेही तातडीने हटविण्यात यावेत, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

पुणे -नाशिक महामार्ग सततच्या वाहतूक कोंडीने वाहतूक कोंडीचा महामार्ग बनला आहे. या महामार्गावर भोसरी ते राजगुरुनपर्यंतचा प्रवास नकोसा झाला आहे. तासाभराच्या या अंतरासाठी सध्या अडीच ते तीन तास लागत आहेत. त्याला कारणीभूत आहेत महामार्गालगतची अवैध बांधकामे, बेशिस्त वाहनचालक आणि अतिक्रमणे.  सध्या पीएमआरडीएकडून चाकण परिसरातील महामार्गातच्या अवैध बांधकामांवर कारवाई सुरु केली आहे. मात्र, ही कारवाई होत असताना महामार्गावर बंद अवस्थेत असलेल्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या मोशी आणि राजगुरुनगर येथील शिरोली टोलनाक्यावर कारवाई करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

या दोन्ही टोलनाक्यांवर अवजड वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होतो.  वाहतूक कोंडीही होते.  वाहने सावकाश पुढे जात असतात. त्याचा फटका वाहनचालकांसह प्रवाशांना बसत आहे.  हे दोन्ही टोलनाके अनेक दिवसांपासून बंद असतानाही ते महामार्गावर का ठेवण्यात आले असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचे उत्तर प्रशासन देईल का, असा खडा सवाल अभय भोर यांनी महामार्ग प्रशासनाला विचारला आहे.

आधीच चाकण परिसरात  वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.  त्यात मोशी येथील बंद टोल नाक्यामुळे अनेकदा वाहनांची कोंडी होताना दिसते. शासनाने हा बंद टोल नाका त्वरित काढावा. जेणेकरून पुण्याहून चाकणला जाणाऱ्या वाहनांना विनाअडथळा प्रवास करणे शक्य होईल. तसेच प्रवासाचा वेळ वाचवता येईल.  या दोन्ही टोलनाक्यांचा काहीच उपयोग नसून महामार्गात तो एक अडथळाच आहे. औद्योगिक क्षेत्रातील अनेक मोठे जॉब घेऊन जाणारे ट्रक या टोलनाक्यांवर वाहतुकीला अडथळा ठरतात.  हे टोल नाके जुने झाल्यामुळे त्याचे काही अवशेष हे गाड्यांवर सुद्धा पडतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याकडे अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Share

Leave a Reply