पुणे: टीम न्यू महाराष्ट्र
पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळी निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर, निवडणूक पोलीस निरीक्षक विवेकानंद सिंग, निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय, पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, निवडणूक पोलीस निरीक्षक ज्योती नारायण, खर्च निरीक्षक कमलेश मकवाना, बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक पोलीस निरीक्षक जॉएस लालरेम्मावी, खर्च निरीक्षक विजय कुमार, शिरुर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, निवडणूक पोलीस निरीक्षक जया गौरी, खर्च निरीक्षक बी. मोहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल यावर लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी. नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी, आदी सूचना योवळी निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.
निवडणुकीत रोकड, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करावी, अशाही सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा सादरीकरणाद्वारे देताना सांगितले, जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागातील मतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी गेल्या तीन वर्षात युवा मतदार, उद्योगांमध्ये काम करणारे मतदार, महिला मतदार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात 83 लाख 38 हजार 747 इतकी मतदार संख्या असून मतदान जागृती उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 1 लाख 1 हजार 444 तर 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 13 लाख 80 हजार 431 असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 8 हजार 382 मतदान केंद्रे असून 19 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नसून शॅडो भागातील 38 मतदान केंद्रे आहेत. येथे संपर्कासाठी हॅम रेडिओसह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदारसंघांसाठी मिळून 10 हजार 31 क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी तसेच 859 सेक्टर पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाल, ईमेल आदीद्वारे तसेच सी-व्हिजीलद्वारे आचारसंहिता मोठ्या 782 तक्रारी प्राप्त झाल्या असून कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती द्विवेदी यांनी सांगितले, बारामती लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार असून मतदारसंघासाठी आवश्यक अतिरिक्त बॅलेट युनिट प्राप्त झाले त्यांच्या पुरवणी सरमिसळसह दुसरी सरमिसळ झाली आहे. मतदान कर्मचाऱ्यांचे तीन प्रशिक्षण झाले असून मतदान केंद्रांवरील तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती देतानाच परवानाप्राप्त शस्त्र जमा करण्याची कार्यवाही, मद्य, रोकड जप्तीची कारवाई आदी माहिती दिली.
बैठकीस सर्व विधानसभा मतदार संघांचे सहायक निवडणूक निरीक्षक, सर्व निवडणूकविषयक जबाबदाऱ्यांचे समन्वयक अधिकारी आदी उपस्थित होते.