पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
वाल्हेकरवाडीतील पालिकेच्या मुलांच्या शाळेमध्ये रिक्त जागांवर शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी संगिता बांगर यांच्याकडे करण्यात आली. तसेच रिक्त पदे न भरल्यास शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला. दरम्यान, येत्या आठ दिवसात सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जातील, असे आश्वासन बांगर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.
या बाबत शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटिका ज्योती संदीप भालके यांनी प्रशासकीय अधिकारी बांगर यांना निवेदन दिले. या वेळी शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर, विभागप्रमुख संदीप भालके, उपशहर प्रमुख हरेश नखाते, उपशहर संघटिका रजनी वाघ, रहाटणी विभागप्रमुख गोरख पाटील, चिंचवड विभागप्रमुख किरण दळवीआदी उपस्थित होते.
वाल्हेकरवाडी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीची पटसंख्या 350 आहे. तर सहावी ते सातवीचा पट 140 आहे. यानुसार शाळेमध्ये 14 शिक्षकांची आवश्यकता आहे. पटसंख्येनुसार शाळेला अजून 4 उपशिक्षक व 3 पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. तसेच मुख्याध्यापिका देखील एक महिन्याने निवृत्त होणार आहेत. मुलांच्या सुट्या संपून शाळा चालू झाली आहे. मात्र, अद्याप शिक्षकांची नेमणूक झालेली नाही. शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाल्हेकरवाडीतील शाळेतील मुलांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी निवदेनात करण्यात आली. 15 दिवसात शिक्षकांची नियुक्ती झाली नाही, तर शाळेसमोर ठिय्या आंदोलन करू, असा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.