चिंचवड : टीम न्यू महाराष्ट्र
रावेत येथील श्री दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या जन्मदिनानिमित्त समीर लॉन्स येथे आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष जगताप यांनी स्वतः उपस्थिती लावून संबंधित तज्ञांशी व डॉक्टर यांच्यासोबत चर्चा करून शिबिर संदर्भात आढावा घेतला. पाटील आय केयर क्लिनिक समूहाच्या नेत्ररोगतज्ञ डॉ. प्राजक्ता पाटील व त्यांच्या सर्व तज्ञ सहकाऱ्यांनी शिबिरात मोलाची भूमिका निभावली. नेत्र तपासणी तथा गरजूंना मोफत चष्मे वाटप व संबंधित नेत्र विकारांवर मोफत शस्त्रक्रिया संबंधित संपूर्ण माहिती डॉ.पाटील यांच्याकडून देण्यात आली. तसेच या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.
गटनेते भाजपा नामदेव ढाके, रावेत-काळेवाडी भाजपा मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे , मंडळ उपाध्यक्ष अजय भोंडवे, निखिल जाधव, सुरेश भोंडवे, संतोष भोंडवे, सुनील भोंडवे, रावेत काळेवाडी भाजपा मंडलचे पदाधिकारी प्रदीप बिजगे, सचिन गावडे आदी उपस्थित होते.
सामान्य जनतेला नेत्र संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते. उपस्थित लाभार्थ्यांमध्ये या उपक्रमामुळे एक समाधान दिसून आले. दरम्यान सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे शंकर जगताप यांनी तोंड भरून कौतुक केले.