पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
जिल्ह्यात निवडणुकीतील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आता घरोघरी भेट देऊन ‘ताई’ला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मागील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि येत्या 7 मे रोजी बारामती व 13 मे रोजी पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकाधिक महिलांनी मतदान करावे यासाठी ‘ताई मतदानाला चला’ हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून मतदान जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘ताई मतदानाला चला’ या उपक्रमांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख, पिंपरी चिंचवड तसेच उपआयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, बचत गटातील महिला, समूह संघटिका यांचे गट तयार करुन मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत.
महिला मतदारांचा मतदानात कमी सहभाग असलेल्या केंद्राची माहिती घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येईल. जिल्ह्यातील 4 हजार 900 पेक्षा जास्त मतदान केंद्र परिसरात ही मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. महिलांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जिल्ह्यात 21 महिला संचालित मतदान केंद्र असणार आहेत. मतदान केंद्रांवर महिलांसाठी स्वतंत्र रांग, पाळणाघर, पाळणाघरात अंगणवाडी सेविका, स्वतंत्र स्वच्छतागृह आदी आवश्यक मूलभूत सुविधादेखील असतील.
हा उपक्रम राबविताना घरोघरी भेटीदरम्यान महिला, वृद्ध, दिव्यांगांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या आणि मतदान सुलभ व समावेशक व्हावे यासाठी मतदानाच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नेमून दिलेल्या भागातील कोणतीही वस्ती, नागरिक दुर्लक्षित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, घरभेटी दरम्यान मतदारांशी नम्रता व सौजन्यपूर्वक संवाद साधावा, आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत, अशी माहिती स्वीप समन्वयक अर्चना तांबे यांनी दिली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे म्हणाले की, जगातील अनेक देशात महिलांना मताधिकारासाठी लढा द्यावा लागला. मात्र आपला देश स्वतंत्र झाल्यावर लगेचच महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत महिलांचाही सहभाग महत्वाचा आहे. महिला मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रांवर महिला मतदारांसाठी आवश्यक सुविधा आहेत. महिला मतदारांनी मोठ्या संख्येने लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेत मतदान करावे, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मतदार नोंदणी करून मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे