भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भोसरी हुतात्मा चौक येथे आयोजित रक्तदान शिबिराला तरुणांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. श्री. म्हसोबा देवस्थान मित्र मंडळ आणि शंभूराजे राज्याभिषेक सोहळा समिती राजधानी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून, पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते. या सामाजिक जबाबदारीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक युवकांनी उत्साहाने रक्तदान केले.
म्हसोबा देवस्थान मंदिर, हनुमान कॉलनी – ४, हुतात्मा चौक, भोसरी येथे झालेल्या या शिबिरात पिंपरी चिंचवड ब्लड बँकेच्या सहकार्याने २५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. परिसरातील किरण भालेकर, दर्शन भुजबळ, स्वप्नील होरे, वरूण गोरडे, स्वराज कराळे, ओंकार जगताप, तेजस गायकवाड आणि आयुष बाणेकर या युवकांनी विशेष सहकार्य केले.
या शिबिरामुळे समाजातील युवकांमध्ये सामाजिक भान वाढीस लागले असून, अशा विधायक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकतेचा संदेश पोहोचतो आहे.