पवईत पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक

मुंबई: टीम न्यू महाराष्ट्र

मुंबईतील पवई येथे पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना, ही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. संतप्त झोपडपट्टीवासियांनी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. त्यानंतर लाठीचार्जही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पवईतील हिरानंदानी भागात अनेक वर्ष जुनी झोपडपट्टी आहे. या झोपडीधारकांना पालिकेने नोटीस दिली होती. आज पालिकेचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी अनधिकृतरित्या वसलेली ही झोपडपट्टी हटवण्यासाठी कारवाई सुरू केली. त्यावेळी तथे मोठ्या प्रमाणात पोलिसही उपस्थित होते. पण या कारवाईमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांवरती आणि पालिका अधिकाऱ्यांवरती थेट दगडांचा मारा करण्यास सुरूवात केली. यामुळे तेथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि वातावरणही तापलं. त्यानंतर पोलिसांनीही थोडाफार लाठीचार्ज केला असून सध्या या भागात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे.

Share

Leave a Reply