दुष्काळी तालुक्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी तालुक्यांसह दुष्काळसदृश महसूल मंडळातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे.

राज्यातील 40 तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. तर 198 तालुक्यांतील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. या शुल्क माफीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांनी बोर्डाला ऑनलाइन पाठवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ही माहिती पाठवण्यासाठी आजवर पाच ते सहा वेळेला मुदतवाढ देखील दिली आहे. आतापर्यंत इयत्ता दहावीतील तीन लाख 37 हजार 44 तर बारावीतील दोन लाख 38 हजार 515 विद्यार्थ्यांची अशी एकूण पाच लाख 75 हजार 559 विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला प्राप्त झाली आहे.

परीक्षा शुल्क माफीसाठी सद्यस्थितीत बोर्डाला 28 कोटी रुपये लागणार आहेत. राज्य शासनाकडून बोर्डाला आठ कोटी 90 लाख रुपये आले आहेत. उर्वरित निधीसाठी मागील आर्थिक वर्षातील निधी वापरण्याची मान्यता मिळावी, तसेच उर्वरित रक्कम शासनाकडून मिळावी, असे पत्र बोर्डाकडून शासनाला पाठवण्यात आले आहे

Share

Leave a Reply