विद्यार्थ्यांनी उत्तुंग कर्तबगारी गाजविण्याचे स्वप्न बाळगावे : ॲड.सुप्रिया बर्गे

बारामती :  टीम न्यू महाराष्ट्र

पालकांनी संसाराची वाढती जबाबदारी पेलताना मुलांची योग्य काळजी घ्यावी. मुलांनी उत्तुंग कर्तबगारी गाजविण्यासह जगात स्वतःचा ठसा उमटविणाचे स्वप्न बघावे, तसेच ते पूर्णत्वास नेण्यासाठी पालकांनी मुलांना भक्कम पाठबळ द्यावे.  पालकांनी मुलांसोबत मनमोकळा सुसंवाद साधण्यासाठी आवर्जून वेळ काढावा, असे आवाहन यशश्री फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ॲड.सुप्रिया बर्गे यांनी केले.

पणदेर (ता. बारामती) येथील भिकोबानगर येथील जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. विशाल बर्गे, सातारा येथील सहाय्यक स्थापत्य अभियंता अवधूत घुले, बारामती सहकारी बँकेचे व्यवस्थापक नवनाथ जगताप,  बाळासाहेब जगताप, दशरथ मुळीक,  धुमाळवाडीचे सरपंच बाळासाहेब कोकरे, शालन कदम, अनिल   जगताप,  धनसिंग जगताप, नंदकुमार  जगताप,  चक्रपाणी जगताप आदी उपस्थित होते. तत्पूर्वी ॲड. सुप्रिया बर्गे यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी शाळेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच कै. उद्धवकाका कदम यांच्या स्मरणार्थ शालन कदम यांनी विद्यार्थ्यांना शालोयपयोगी वस्तूंसाठी ५ हजार रुपयांची देणगी दिली. सरपंच बाळासाहेब कोकरे यांनी लेझीम  नृत्यासाठी रोख पाचशे रुपये व  विद्यार्थ्यांसाठी वह्या दिल्या. ग्रामविकास मंच भिकोबा नगर यांच्यावतीने शाळेसाठी दोन डस्टबीन देण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी व पालकांनी विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट, बिस्कीटचे वाटप केले.  विद्यार्थ्यांनी  देशभक्तीपर गीत, पोवाडे, विविध कवायती सादर करुन उपस्थितांनी मने जिंकली.   शाळेचे अध्यक्ष विनोद जगताप यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.  शाळेच्या मुख्याध्यापिका स्वरांजली जगताप यांनी  आभार मानले.

ॲड. विशाल बर्गे यांनी वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती, अपहरण, देहविक्री, अवयवविक्री, अवैध व्यवसायासह गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलामुलींचा  होणार वापर चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले. मोबाईल व सोशल मीडियाचा गैरवापर,  मोबाईल गेम मुळे होणारे नुकसान याची माहिती दिली. इंटरनेट मोबाईलचा योग्य प्रमाणात, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Share

Leave a Reply