सिंहगड किल्ल्यावर घडलेल्या प्रकाराबद्दल शिवप्रेमींकडून खेद
पुणे ः टीम न्यू महाराष्ट्र
किल्ले सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकांना शिवीगाळ शिवकवून ती देण्यास सांगणाऱ्या तरुणांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दुर्गा ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांनी केली आहे. तसेच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली. त्यांच्याच गडकिल्ल्यांवर महाराष्ट्रातील तरुणांकडून असे वर्तन व्हावे ही लाजीरवाणी बाब असल्याचे सांगत भोर यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर न्यूझीलंड येथील पर्यटक पर्यटनासाठी आला असता त्याला काही तरुणांनी मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडले होते. याबाबतचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर हवेली पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत हुल्लडबाज तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. ऐतिहासिक अशा सिंहगड किल्ल्याची माहिती विदेशी पर्यटक व्लॉगमधून देत असताना काही तरूणांनी त्याला मराठीतून अश्लील शिवीगाळ शिकवून ती देण्यास भाग पाडले. न्यूझीलंडच्या पर्यटकाच्या व्लॉगमधील संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. न्यूझीलंडमधील पर्यटकाचे नाव ल्युक आहे. त्याने ल्युक द एक्सप्लोरर या त्याच्या युट्यूब वाहिनीवर ६ एप्रिल रोजी सदर व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.