पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
ससून रुग्णालयात झालेल्या रक्तनमुना फेरफार प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. डॉ. अजय तावरे याचा आपल्यावर दबाव असल्याची कबुली डॉ. श्रीहरी हाळनोरने दिली आहे. डॉ. तावरे आणि विशाल अगरवाल यांचे बोलणे झाल्यानंतर रक्तनमुना बदल करण्यासाठी डॉ. तावरे याने दबाव टाकल्याचे डॉ. श्रीहरी हाळनोरने सांगितले. रक्ताच्या नमुन्यात बदल केला. पण ते माझ्या मनाला पटत नव्हते. माझ्याकडून मोठी चूक झाली असे मला वाटत होते. अशी कबुली डॉ. श्रीहरी हाळनोरने दिली. डॉ. श्रीहरी हाळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.
पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीची चाचणी करण्यात आली होती.यात घेतलेले रक्ताचे नमुने ससूनमधील डाॅक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिल्याप्रकरणी डाॅ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोन डॉक्टरांसह शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली होती.पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्शे स्पोर्ट्स कार बेदरकारपणे चालवून मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुण अभियंते जागीच ठार झाले. त्यात एक तरुणी आणि एका तरुणाचा समावेश होता. दोघेही आयटी इंजिनिअर होते. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेली तरुणी १६ फूट उडून रस्त्यावर आदळली अन् गतप्राण झाली. या अपघातात अनिस अवधिया (वय २७) आणि अश्विनी कोस्टा (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला. कल्याणीनगर येथील लँडमार्क सोसायटीजवळ १९ मे (रविवार) पहाटे अडीच वाजता हा भीषण अपघात झाला