मुंबई : टिम न्यू महाराष्ट्र
सध्याच्या जमान्यात स्टायलिश दिसण्यासाठी तसेच पांढरे केस लपविण्यासाठी प्रत्येकजण केसांना डाय करतात. काळ्या रंगासोबत हल्ली बाजारमध्ये विविध रंगांचे डाय मिळतात. त्याचा महिलांंसह अनेकजण सर्रासपणे वापर करतात. केस रंगवल्याने ती व्यक्ती छान, आकर्षक दिसते. मात्र सतत डाय करणे हे केसांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.
केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो
हेअर डाय हा विविध रसायने वापरून बनवलेला असतो. या रसायनांमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. शिवाय केसांची मुळे कमकुवत होऊन केस लवकर तुटू लागतात.
टाळूचे नुकसान होऊ शकते
हेअर डायमधील रसायने टाळूचे नुकसान करू शकतात. यामुळे खाज, जळजळ आणि लालसरपणा यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. काहींना स्कॅल्प ऍलर्जी असू शकते, त्यामुळे एक्झिमा किंवा डर्माटायटीससारख्या गंभीर समस्या होण्याची भीती असते.
केस गळतीसह वाढ थांबते
सातत्याने हेअर डाय केल्याने केसांच्या मुळांवर विपरीत परिणाम होतो. परिणामी केसगळतीची समस्या वाढू लागते. रसायनांचा जास्त वापर केल्याने केसांची मुळे कमकुवत होऊन केसांची वाढ थांबते.
केसांचा नैसर्गिक रंग निघून जातो
हेअर डायच्या वारंवार वापरामुळे केसांचा नैसर्गिक रंग निघून जातो. यामुळे केसांचा रंग बदलतो आणि निस्तेज होऊ शकतो. तसेच केसांच्या टेक्श्चरवरही वाईट परिणाम होतो.
वेळ आणि पैसा वाया जातो
केसांना पुन्हा पुन्हा रंग लावण्यात बराच वेळ आणि पैसा वाया जातो. प्रत्येक वेळी तुम्ही हेअर डाय विकत घेता किंवा सलूनमध्ये जाऊन डाय लावता तेव्हा त्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे हेअर डाय वापरताना नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घ्यावी. जेणेकरून केसांचे आणि टाळूचे कमीत कमी नुकसान होईल.