डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पगार कुटुंबीयांची घेतली संवेदनशील सांत्वनपर भेट
वाशिम : टीम न्यू महाराष्ट्र
ज्येष्ठ आणि सन्माननीय पत्रकार, तसेच श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय नितीन पगार यांच्या अकस्मात निधनाने वाशिममधील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, त्या दु:खद क्षणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी कुटुंबीयांची भेट घेत माणुसकीचा आणि आपलेपणाचा हात पुढे केला.
आरोटे यांनी दि. १५ जून रोजी वाशिम येथे स्वतः उपस्थित राहून जानवी नितीन पगार आणि त्यांचा लहान मुलगा युगंधर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कुटुंबीयांना ११ हजार रुपयांची रोख मदत आणि रोजच्या गरजेचे किराणा साहित्याचे किट सुपूर्त केले.
या वेळी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांनी स्व. नितीन पगार यांची पार्श्वभूमी आणि कुटुंबीयांची परिस्थिती समजावून सांगितली. पत्रकार संघाचे नाशिक संपर्कप्रमुख विजय शेळके, संजय फुलसुंदर, अॅड. सुरेश टेकाळे, संजीव भांदुर्गे, श्याम अपूर्वा, सामाजिक कार्यकर्ते गजानन धामणे आणि अनेक मान्यवर या भावनिक क्षणी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर येथे संपलेल्या मराठवाडा विभागीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर कोणतीही विलंब न करता डॉ. आरोटे यांनी थेट वाशिम गाठले. त्यांनी स्व. नितीन पगार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत कृतज्ञ श्रद्धांजली वाहिली. दरम्यान ही भेट केवळ औपचारिक नव्हती… ती नितळ माणुसकीची, बांधिलकीची आणि आपल्या पत्रकार बांधवांप्रती असलेल्या नात्याची साक्ष होती.
डॉ. आरोटे यांनी अत्यंत आपुलकीने सांगितले की “हा संघर्ष तुम्ही एकट्याने करायचा नाही, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सदैव तुमच्या पाठीशी आहे.” त्या क्षणी जानवीताईंना आणि उपस्थित साऱ्यांना मायेचा ओलावा जाणवला… आणि डोळ्यांतून अलगद अश्रू वाहू लागले. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर एका खंबीर आधाराची भावना होती.
