– अजित गव्हाणे यांच्या विजयासाठी शिवसेनेची आक्रमक भूमिका
– नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर शड्डू ठोकणाऱ्या महेश लांडगे यांच्यावर टीकास्त्र
– निष्ठावंत शिवसैनिक इतिहास घडवतील- अजित गव्हाणे
भोसरी 5 नोव्हेंबर :
मोशी गावचा इतिहास सांगतो मोशीकर ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांचा विजय निश्चित असतो. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या पाठीशी मोशीकर एकवटले आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री इथेच नक्की झाली असा विश्वास शिवसेनेच्या (उबाठा) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी व्यक्त केला. आता ” मोशीकरांनी ठरवायचे श्री. नागेश्वर महाराजांना दंडवत घालून प्रांजळ आशीर्वाद मागणाऱ्या अजित गव्हाणे यांना निवडून आणायचे की, नागेश्वर महाराजांसमोर शड्डू ठोकणाऱ्या मग्रूर प्रवृत्तीला पुढे न्यायचे.”अशी आक्रमक भूमिका देखील सुलभा उबाळे यांनी मांडली.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे आयोजित दौऱ्याची सुरुवात श्री. नागेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. यावेळी सुलभा उबाळे बोलत होत्या. या निमित्ताने माजी नगरसेवक बबन बोराटे, धनंजय आल्हाट, लक्ष्मण सस्ते, वसंत बोराटे, संजय नेवाळे, परशुराम आल्हाट, माजी नगरसेविका विनया तापकीर, हरिभाऊ सस्ते , निलेश मस्के, तुषार सहाने, वैशाली गव्हाणे, निलेश मुटके, रूपाली आल्हाट आदि उपस्थित होते.
उबाळे पुढे म्हणाल्या सत्याची कास धरून निष्ठावंत म्हणून आम्ही काम करत राहिलो आहोत. संघर्षाच्या काळात आमच्या पक्षाशी आम्ही इमान राखले. आमच्या शहराशी आम्ही इमान राखून आहोत. महाविकास आघाडीत एकत्र असलेले आमचे पदाधिकारी हीच भावना कायम ठेवून आहेत. अजित गव्हाणे पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मोहिनी लांडे महापौर होत्या. मात्र आमदार म्हणून विलास लांडे यांनी कोणतेही चुकीचे काम करायला या दोघांनाही सांगितले नाही किंवा तसा पायंडा महापालिकेमध्ये पाडला नाही. मात्र गेल्या दहा वर्षात सगळे कायदे पायदळी तुडवून कारभार सुरू आहे. विलास लांडे आमदार होते . आम्ही विरोधी पक्षात होतो मात्र विरोधकांना बोलण्याची मुभा होती. काम करण्याचे स्वातंत्र्य होते. आता हा मुद्दाच बाजूला राहिला आहे. भ्रष्टाचाराची बजबजपुरी महापालिकेत निर्माण झाली आहे. असा प्रकार आमदार म्हणून विलास लांडे यांनी केलेला मी तरी पाहिलेला नाही.
सुलभा उबाळे यावेळी म्हणाल्या या विजयाचे शिल्पकार माजी आमदार विलास लांडे आपल्या सोबत आहेत. वस्तादाची एंट्री शेवटी होते मात्र त्या एन्ट्रीने विजय दृष्टीक्षेपात आलेला असतो. भोसरीच्या कर्दनकाळाचा नाश करण्याची वेळ आलेली आहे. ही अचूक वेळ साधण्यासाठी प्रत्येकाने येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुतारी चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे असे आवाहन सुलभा उबाळे यांनी केले.
अजित गव्हाणे यावेळी म्हणाले भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्यासारखे वस्ताद आपल्या सोबत आहेतच. मात्र या भागातील निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या कामातून महाविकास आघाडीसाठी इतिहास घडवणार आहेत.