– नागरिक परिवर्तनावर अटळ; विरोधक सैरभैर
-शरद पवारांकडून विरोधकांचा ‘अनुल्लेख’ हाच मतदारांना सूचक संदेश – पंकज भालेकर
-भाजप उमेदवाराचे नाव न घेता शरद पवारांनी विकासाच्या मुद्द्याला दिले प्राधान्य- भालेकर
– ‘अनुल्लेख’ करत टाळले ,विरोधकांना उंची दाखविली- पंकज भालेकर
भोसरी 15 नोव्हेंबर:
विषयाचे टाइमिंग कसे साधावे आणि त्याची बातमी कशी होईल हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच माहित आहे. विरोधकांवर टीका केली असती तर एका दिवसात त्या बातमीची टाईम लाईन संपली असती मात्र विरोधकांना ‘अनुल्लेख’ करत टाळल्यामुळे शरद पवार यांच्या भोसरीतील सभेनंतर दोन दिवसांनीही या ‘अनुल्लेखाचे’
कवित्व संपलेले नाही. आजही वाड्यावर वस्त्यांवर,चौका चौकात, कट्ट्यांवर विरोधकांना शरद पवारांनी ‘अनुल्लेख’ करत टाळले अशी चर्चा रंगली आहे. यातच मतदारांना शरद पवारांनी दिलेला सुचक संदेश लक्षात आला आहे. भ्रष्टाचार, दडपशाहीच्या विरोधात विकासाचा मुद्दा शरद पवारांनी सर्वांच्या हाती सोपवला असल्याचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बुधवारी भोसरीतील गाव जत्रा मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. शरद पवार या सभेमध्ये विरोधकांवर कसे तोंड सुख घेतात याविषयीच्या अक्षरशः पैजा रंगल्या होत्या. सभेला ‘ न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद लाभला. यामुळेच सर्वप्रथम विरोधकांच्या पोटात गोळा आला. यानंतर शरद पवार आता काय बोलतील याविषयी विरोधकांच्या गोटात प्रचंड भीती असताना शरद पवारांनी विरोधकांना ‘अनुल्लेख करत’ टाळले. याउलट शरद पवारांनी महिलांची सुरक्षा, भाजपची केंद्रातली भ्रष्ट सत्ता, स्थानिक पातळीवर सत्तेतून निर्माण होत असलेली भ्रष्ट व्यवस्था नागरिकांच्या समोर ठेवली. तरुणांच्या हाताला काम, रोजगार कौशल्य विकास, महिला सुरक्षेला प्राधान्य, कारखानदारीसाठी नव्याने प्रयत्न अशी विविध विषयांची पंचसूत्री नागरिकांच्या समोर ठेवली. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये नामांकित शिक्षण संस्था येत आहेत. आमची मुले पदवीधर होत आहेत. मात्र त्यांच्या हाताला काम नाही हा मुद्दा त्यांनी मांडला आणि याबाबत नागरिकांना अक्षरशः विचार करायला भाग पाडले. यातून नागरिकांनी घ्यायचा तो संदेश घेतला आहे. मुळात भोसरी मतदारसंघातील वातावरण फिरले आहे. समाविष्ट गावातील मतदार 20 नोव्हेंबरची वाट पाहत आहेत. गेल्या दहा वर्षातील दडपशाही झुगारून देण्यासाठी नागरिकांनी परिवर्तन करायचे ठरवले आहे . महाविकास आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद, स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भाजप उमेदवाराला त्यांची जागा यापूर्वीच दाखवून दिलेली आहे. त्यामुळे विरोधक पुरते सैरभैर झाले आहेत.
…………….
शरद पवारांनी उंची दाखवली
एखाद्या विषयाचे टाइमिंग कसे साधावे आणि त्यातून बातमी कशी होईल त्यातून त्याची रंगतदार चर्चा सुरू कशी राहील याची एक विशेष काळजी शरद पवार नेहमीच घेतात. भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विरोधी उमेदवाराचा अनुल्लेख करत, अगदी शब्दही न उच्चारता त्यांनी प्रत्येकाला याविषयी विचार करायला भाग पाडले. मग याची चर्चा रंगली नसेल तरच नवल. विरोधी गोटातूनही याचे कवित्व अजूनही संपलेले नाही. वाड्या वस्त्यांवर, चौका चौकात याच विषयाची चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे जायचा तो संदेश मतदारांमध्ये बरोबर पोहोचला आहे. मुख्य म्हणजे विरोधकाचा अनुल्लेख करून शरद पवारांनी त्यांची उंची दाखविली आहे.
…………..
शरद पवार उत्तर पुणे जिल्ह्यातील उमेदवारांवर का बरसले?
जुन्नर, आंबेगाव, खेड या उत्तर पुणे जिल्ह्यातील मतदार संघामध्ये शरद पवारांनी तोफ डागली. विरोधकांना अक्षरशः गद्दार म्हणून नामोल्लेख करून त्यांनी मतदारांना या गद्दारांना जागा दाखवा असे अपील केले. या ठिकाणी असलेले विरोधी उमेदवार हे शरद पवारांनी मोठे केलेले, त्यांना वेळोवेळी सत्तेमधील महत्त्वाची पदे, मानसन्मान सर्वकाही दिले असताना गद्दारी करून पक्षाला फोडले ही सल शरद पवारांची होती. त्या तुलनेत भोसरी मतदारसंघातील विरोधी उमेदवाराला त्यांची उंची दाखवत शरद पवारांनी या मतदारसंघाच्या व नागरिकांच्या विकासाला महत्त्व दिले आहे.
.……….
एकीकडे मतदार संघात आखाड पार्टी करून तरुणांना झिंगायला लावणाऱ्या, धर्माचे बेगडी पांघरून घेऊन मते मागणाऱ्या भाजप उमेदवाराबाबत शरद पवारांनी बोलणे जाणीवपूर्वक टाळले आहे. याची पुरेपूर जाणीव विरोधकांना देखील आहे. एक वेळ शरद पवारांनी केलेली टीका सर्वांच्या पचनी पडली असती. मात्र पवार साहेबांचा ‘अनुल्लेख’ पचवणे विरोधकांना जास्त जड जात आहे.
पंकज भालेकर
माजी नगरसेवक
……