भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने चिखली आणि कुदळवाडी येथील प्रस्तावित टाऊन प्लॅनिंग (TP) स्कीम अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला या निर्णयाने यश लाभले आहे.
भूमिपुत्रांच्या हक्कासाठी संघर्ष
चिखली आणि चऱ्होली भागातील प्रस्तावित TP Scheme संदर्भात आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली होती. त्या बैठकीत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अखेर, 15 मे 2025 रोजी सर्वसाधारण सभेत ही योजना रद्द करण्यास मंजुरी देण्यात आली.
या निर्णयामुळे अनेक दशकांपासून भूसंपादनाच्या झळा सहन करणाऱ्या स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. औद्योगिक विकास महामंडळ, नवनगर विकास प्राधिकरण आणि टाटा मोटर्सच्या विस्तारीकरणासाठी याआधीही त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या होत्या. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष वाढला होता.
चिखलीतील TP Scheme रद्द झाल्यानंतर आता चऱ्होलीतील प्रस्तावित योजना रद्द करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यासंदर्भात लवकरच वाघेश्वर महाराज मंदिरात आयुक्त व ग्रामस्थ यांच्यात बैठक होणार असून, त्या बैठकीत भूमिपुत्रांची बाजू समजून घेतली जाणार आहे. प्रशासनाने स्थानिकांचा विश्वास जिंकूनच निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे.
“चिखली-कुदळवाडीतील भूमिपुत्रांच्या न्याय्य मागणीला मान्यता दिल्याबद्दल मी महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानतो. या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. चऱ्होलीची TP Scheme देखील रद्द व्हावी, अशी आमची ठाम भूमिका आहे. संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) येत्या तीन महिन्यांत अंतिम होणार आहे, त्यामुळे चऱ्होलीसाठी स्वतंत्र TP Scheme ची आवश्यकता नाही.”
महेश लांडगे ः आमदार, भोसरी विधानसभा.