पांडुरंगाच्या सेवेसाठी एकवटला उच्चभ्रु सोसायटीतील श्रीमंत वर्ग 

पिंपरी येथील सेंट्रालिज महिंद्रा सोसायटीतील भाविकांनी केली वारकऱ्यांची सेवा  

 

पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र

वारकरी संप्रदाय ही केवळ महाराष्ट्राची धार्मिक परंपरा नसून, ती एक सामाजिक शक्ती असल्याचे यंदाच्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पिंपरी येथील एका उच्चभ्रू, आधुनिक सोसायटीतील  शिक्षित समाजाने वारकऱ्यांच्या सेवेचा मान मिळवून एक नवा आदर्श घालून दिला आहे. तर या श्रीमंत भाविकांनी केलेल्या सेवेने वारकरीही हरखुन गेल्याचे पहायला मिळाले.

पिंपरी येथील महापालिका भवनाशेजारील सेंट्रालिज महिंद्रा या प्रतिष्ठित गृहनिर्माण सोसायटीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या यवत (ता. दौंड) येथील काळभैरवनाथ दिंडीतील  वारकऱ्यांना सकाळच्या न्याहरीसाठी आपल्या सोसायटीत सादर आमंत्रित केले. महापालिका भवनाशेजारुन या दिंडीतील वारकऱयांना सोसायटीत येण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी सोसायटीचे पदाधिकारी पहाटेपासून या दिंडीची वाट पाहत होते.

सकाळी ७.३० वाजता ही दिंडी सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर आल्यानंतर सोसायटीतील पदाधिकारी व भाविकांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर अभंग आणि हरिनामाचा जयघोष करीत ही दिंडी सोसायटीच्या सभागृहात पोहोचली. तेथे अबालवृद्धांची वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी झुंबड उडाली होती. कुणी चहा, कुणी इडली, तर कुणी पाणी आणि उडीद वडे तसेच अन्य अल्पोपहाराचे पदार्थ  देत होते.  वारकऱ्यांच्या पायावर डोके ठेवून  त्यांचे आर्शीवाद घेण्यासाठी सोसायटीतील अबालवृद्धांनी गर्दी केली होती.

या माध्यमांतून श्रीमंत आणि उच्चशिक्षित भाविकांनी श्रद्धेने या पालखी सहभागी होत आपली पांडुरंगभक्ती व्यक्त केली. तसेच टाळ मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने सोसायटी आवार भक्तीरसात चिंब न्हाहून निघाले होते. या वारकरी सेवेमुळे शहरात राहणारा आधुनिक, तांत्रिक आणि उच्चशिक्षित वर्गही वारकरी संप्रदायाशी एकरूप होत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. दरम्यान,  चारशे कुटुंबाच्या या सोसायटीने तीनशे वारकऱ्यांचरणी आपली सेवा रुजू केली. तर राहूल रेवाळे यांनीही वारऱ्यांना साबुदाणा खिचडीचे वाटप केले. यानंतर अभंंग, कीतर्नानंतर दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, “यापुढे दरवर्षी आम्ही ही सेवा अधिक श्रद्धेने करू,अशी भावना सोसायटीतील सदस्य समीर गावकर यांनी व्यक्त केली. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र साळुंके, सरचिटणीस अक्षय जाधव, उपाध्यक्ष सचिन सानप,  खजिनदार नागेश गाडे, यांनी संयोजन केले. तर सदस्य संदिप शिंदे, संतोष ताजणे, मुकेश सोळंके, अविनाश पाटील, प्रवीण शिंदे, किरण कांबळे, अभिषेक परमार यांच्यासह अन्य सदस्य आणि रहिवाशांनी वारकऱयांची सेवा करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

उंच इमारतीमधील या श्रीमंत भाविकांनी आम्हाला सोसायटीत सकाळच्या न्याहारीसाठी निमंत्रित केले. पावसात आम्हाला या सोसायटीत विसावा मिळाला. आमचे आदरातिथ्य झाले, चहा आणि नाश्ताही झाला. ही आमच्यासाठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. कारण ही सगळी श्रीमंत मंडळी आणि कष्टकरी शेतकरी. तरीही पांडुरंगाच्या भक्तीने गरिब श्रीमंतांमधील दरी क्षणात दूर झाली. पांडुरंग भक्ती श्रेष्ठ असल्याची अनुभुती या सोसायटीत आम्ही अनुभवली.

-बबन दोरगे ः अध्यक्ष, श्री काळभैरवनाथ प्रासादिक दिंडी, यवत ( रथामागे २६० वा क्रमांक)

Leave a Reply