पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
पावसाळयात मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यातील भुशी डॅमवर गर्दी करताना दिसतात. नुकतेच भुशी डॅमवर एकाच घरातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली. यानंतर आता ताम्हिणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेल्याचे समोर आले आहे. स्टंटबाजी करण्याच्या नादात ताम्हिणी घाटामध्ये हा तरुण वाहून गेल्याचे व्हायरल व्हिडीओतून दिसत आहे.
स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी (ता. २९ जून) ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने धबधब्यातील पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात वाहून गेला. ताम्हिणीमध्ये बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह मानगावमध्ये सापडला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भुशी डॅमनंतर आता ताम्हिणी घाटामध्ये तरुण वाहून गेला. स्वप्नील धावडे यांनी त्यांच्या जीम मधील सहकाऱ्यांसमोर फेसाळत्या पाण्यात उडी मारली. सुरुवातीला त्यांनी काठावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र धबधब्याच्या टोकाला आल्यानंतर त्यांची दगडावरील पकड निसटली आणि ते धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. या तरुणाला स्टंटबाजी करणे चांगलेच महागात पडले आहे.