मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना पक्षानं राज्यात १३ जागा लढवल्या. सांगलीत विशाल पाटलांच्या रुपात काँग्रेसचा बंडखोर विजयी झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचं महत्त्व वाढलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीची कामगिरी चांगली झाली. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत.
काँग्रेसचे जवळपास अर्धा डझनहून अधिक प्रदेशाध्यक्ष, काही राज्यांचे प्रभारी सरचिटणीस बदलण्यात येणार आहेत. हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षांना पदावरुन दूर केलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर तेलंगणात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या रेवंत रेड्डींना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागेल असे देखील सांगितले जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी चांगली झाली. पण यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वाटा नेमका किती, हा प्रश्न आहे. काँग्रेसच्या यशात केंद्र सरकारविरोधातील नाराजीचा मोठा वाटा आहे. काँग्रेसच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी आपापली कामगिरी चोख बजावल्यानं पक्षाला दणदणीत यश मिळालं. त्यामुळे काँग्रेसच्या विजयात दुसऱ्या फळीतील नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी यापैकी एखाद्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं.
लोकसभेतील काँग्रेसच्या यशानंतर विधानसभेच्या जागावाटपाच्या दृष्टीनं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दावे सुरु केले. त्याला निवडणूक प्रभारी चेन्निथला यांनीच टाचणी लावली. मित्रपक्षांना दुखावण्याची भूमिका असा सल्ला देत चेन्निथला यांनी पटोलेंना कानपिचक्या दिल्या. त्यानंतर पटोलेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी मारली. शनिवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पटोलेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.मविआच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार का याची चर्चा सुरु झाली. प्रदेशाध्यक्ष भावी मुख्यमंत्री असतो. त्यामुळे काँग्रेस या पदावर कोणाची निवड करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अमरावतीमधील विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यशोमती ठाकूर, कोल्हापूरमध्ये शाहूंना निवडून आणणारे सतेज पाटील यांचीही नावं प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे पटोलेंचे उद्धव ठाकरेंसोबत खटके उडत असताना ठाकूर, पाटील हे दोन्ही नेते काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना घेऊन मातोश्रीवर गेले होते. त्यांनी दिल्लीत जाऊन गांधी कुटुंबाची भेटही घेतली होती.