चिखली ग्रामस्थांच्या बैठकीत दिले आश्वासन
भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
चिखली आणि चऱ्होली परिसरातील भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या टीपी स्कीमच्या विरोधात स्थानिक जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी भूमिपुत्रांच्या भावनांना प्रतिसाद देत, “न्यायहक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत TP Scheme होवू देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. दरम्यान, आ. लांडगे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे यामुळे चिखली-चऱ्होलीतील भूमिपुत्रांना लढ्याला बळ मिळाले असून, TP Scheme विरोधातील लढा अधिक धारदार होण्याची चिन्हे आहेत.
टाळगाव चिखली येथील श्री गणेश मंदिरात श्री भैरवनाथ टीपी स्कीम विरोधी कृती समितीच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली. यामध्ये सर्व ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी व स्थानिक भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीनंतर ग्रामस्थांच्या वतीने आमदार लांडगे यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
भूमिपुत्रांच्या भूमीवर अन्यायाची मालिका
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंत आमच्या जमिनी वारंवार सरकारकडून भूसंपादित करण्यात आल्या आहेत.
-
1970 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाने पहिला भूसंपादन करून अन्याय केला.
-
त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापून आमचा विरोध असतानाही जमिनी घेतल्या.
-
टाटा मोटर्सच्या विस्तारासाठी पुन्हा जमिनी गेल्या.
-
1997 मध्ये महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश केला गेला, त्यालाही ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता.
प्रत्येक टप्प्यावर भूमिपुत्रांच्या भावना, त्यांच्या जीवनशैलीचा विचार न करता निर्णय घेण्यात आले, असा आरोप यावेळी करण्यात आला.
TP Scheme रद्द करण्याची ठाम मागणी
“आमच्या बागायती जमिनी हिरावून घेत, आम्हाला भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. इतर भागांतील TP Scheme चा अनुभव अत्यंत दुर्दैवी ठरलेला आहे. या योजनांमुळे 25 वर्षांतही कोणताही विकास झालेला नाही.
शेतकऱ्यांची आर्थिक हानी, जमिनीचे अवमूल्यन आणि भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेता, “ही योजना तात्काळ रद्द करा,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी या बैठकीत लावून धरली.
राजकीय आणि सामाजिक संघर्षाचा केंद्रबिंदू – महेश लांडगे
“भूमिपुत्रांचा स्वाभिमान व न्यायहक्क यासाठी संघर्ष हेच माझ्या राजकीय आयुष्याचं ब्रीद आहे. या भूमीचा वारसदार म्हणून मी कोणत्याही परिस्थितीत TP Scheme होवू देणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका आमदार महेश लांडगे यांनी मांडली.