चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र
चिखली येथील साने चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या चौकात कोणत्याही वेळी अचानक वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीचा परिणाम आता चौकातील व्यावसायिकांच्या व्यावसायावर होऊ लागला आहे. त्यात भर पडते ती रिक्षा चालकांची. त्यामुळे जीएमसी राज पॅलेस सोसायटीतील व्यापाऱ्यांनी सोसायटीसमोर बेकायदेशीर रिक्षा उभ्या करण्यास विरोध केला आहे. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच येथे रिक्षा उभ्या करण्यास मज्जाव करण्याची मागणी करण्यात आली आहे.
साने चौकातील जीएमसी राज पॅलेस या इमारतीमध्ये 40 पेक्षा जास्त दुकाने आहेत. येथे खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल राहते. असे असताना इमारतीसमोर रिक्षाचालक उभे असतात. त्यामुळे सोसायटीत येणाऱ्या ग्राहकांना त्यांची वाहने कुठे लावायची असा प्रश्न निर्माण होतो. रिक्षांमुळे सोसायटीतील दुकानांकडे जाताना अडचण येते. तसेच खरेदी करण्याकरिता आलेल्या ग्राहकांना मोटरसायकल व त्यांची इतर वाहने लावण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे ग्राहक अन्य दुकांनांमध्ये जाणे पसंद करतात. पर्यायाने जीएमसी राज पॅलेसमधील व्यापाऱ्यांचे नुकसान होते.
साने चौकात आकुर्डी -चिखली रस्त्याच्या डावीकडे रिक्षा चालकांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे २० ते २५ वर्षांपासून रिक्षा स्टॅंड आहे. असे असताना साने चौकातच दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच जीएमसी राज पॅलेस इमारतीसमोरही रिक्षाचालक रिक्षासह आपला व्यावसाय करतात. परिणामी या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. शिवाय हे रिक्षा चालक सोसायटीतील दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना दुचाकी व अन्य वाहने उभी करण्यावरुन अरेरावी करतात. त्यामुळे या रिक्षा चालकांना सोसायटीसमोर रिक्षा उभ्या करण्यास मज्जाव करावा, अशी मागणी सोसायटीचे अध्यक्ष नेताजी काशिद, सचिव प्रदिप खोल्लम, खजिनदार अनिल सोमवंशी यांच्यासह सोसायटीतील व्यापारी सदस्यांनी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बांगर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनाच्या प्रती तळवडे वाहतूक विभाग, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग, फ प्रभाग अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रश्नी लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष नेताजी काशिद यांनी दिली.