सांगोला : टीम न्यू महाराष्ट्र
मराठा आरक्षणासाठी सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदाराने पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळले. तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना ही घटना घडली. त्यामुळे बागलवाडी येथे फेरमतदान घेतले जात आहे.
दादासाहेब तळेकर यांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बागलवाडी मध्ये सुमारे 1300 मतदान आहे. मंगळवारी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दादासाहेब हे मंगळवारी दुपारी मतदान करण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी लहान बाटलीमध्ये पेट्रोल नेले होते. दादासाहेब यांनी ईव्हीएमवर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले.
ईव्हीएम पेटल्याचे दिसताच मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. जळणाऱ्या ईव्हीएमवर पाणी मारून आग विझवण्यात आली. यामध्ये ईव्हीएम पूर्णपणे खबर झाले. प्रशासनाने नवीन ईव्हीएम मशीन आणून फेरमतदान सुरु केले आहे.
दासाहेब तळेकर यांनी हे कृत्य का केले, असा प्रश्न सर्वांना पडला होता. चौकशीत त्याचे कारण समोर आले आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.