पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
दैनंदिन आयुष्यात अत्यंत आवश्यक असलेल्या विजेचा वापर केल्यानंतर बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक (आरसीआय) २० लाख ३५ हजार ९४४ ग्राहकांकडे ४८४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून पुन्हा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी थकबाकीच्या रकमेसोबतच नियमानुसार ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी भरणे आवश्यक आहे. यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुनर्जोडणी शुल्क निश्चित केले आहे. यामध्ये लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी २१० रूपये व थ्री फेजसाठी ४२० रुपये तसेच उपरी व भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे दिलेल्या वीजजोडण्यांच्या पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी प्रत्येकी ३१० रुपये व थ्री फेजसाठी प्रत्येकी ५२० रुपये शुल्क आहे. तर उच्चदाब वर्गवारीसाठी ३१५० रुपये शुल्क लागू आहे. या सर्व शुल्कांवर १८ टक्के जीएसटी कर लागू आहेत. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वीजबिलांच्या वसूलीवरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. गेल्या एक दोन महिन्यांत वीजबिलांच्या थकबाकीमध्ये वाढ झाल्यामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे स्वतः दौऱ्यावर असून थेट शाखा कार्यालयांपर्यंत वीजबिल वसूलीचा आढावा घेत आहेत. तसेच खंडित केलेल्या वीजजोडण्याची तपासणी करीत आहे. यासोबतच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे), श्री. सुनील पावडे (बारामती) व श्री. धर्मराज पेठकर (प्रभारी-कोल्हापूर) यांच्यासह सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी आणि विशेष पथके थकबाकी वसूलीसाठी ‘ऑन फिल्ड’ आहेत.
इतर खर्चाच्या तुलनेत ग्राहकांकडून केवळ वीजबिल नियमित भरण्यास फारसे प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे थकबाकी देखील वाढत आहे. सध्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- २८१ कोटी ६८ लाख रुपये (९,७०,४५०), सातारा- ४० कोटी ३८ लाख (२,४०,७०), सोलापूर- ७३ कोटी २४ लाख (३,२६,४६०), कोल्हापूर- ४० कोटी २ लाख (२,४०,८१५) आणि सांगली जिल्ह्यात ४८ कोटी ८७ लाख रुपयांची (२,५८,१५०) थकबाकी आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी, असे आवाहन प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे. वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. सोबतच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.