नवी दिल्ली: टीम न्यू महाराष्ट्र
इराणने इस्त्राइलवर हल्ला केल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या काळात इराण आणि इस्राइलमध्ये युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जगाचं टेंशन वाढणार आहे. युद्धाला सुरुवात झाली तर त्याचा परिणाम जगभरातील सर्वसामान्य लोकांवर पडणार आहे. युद्धाचा नेमका परिणाम कशावर पडेल हे आपण पाहुया.
युद्ध सुरु झाल्यास जगभरात महागाई वाढणार आहे. याशिवाय ग्लोबल शेअर मार्केटमध्ये उलथापालथ होणार आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी ही नक्कीच चांगली बातमी नाही. युद्धाला तोंड फुटण्याच्या शंकेनेच अनेक देशांचा आयात-निर्यात प्रभावित झाला आहे. सोन्याच्या भावामध्ये देखील वाढ झाली आहे. तज्त्राच्या मतानुसार येणारा काळ अधिक संकट घेऊन येणार आहे.
इराणने इस्राइलवर हल्ला केल्याने पश्चिमी आशियामध्ये अशांतता निर्माण झाली आहे. जगातील एक तृतीयांश कच्चे तेल हे याच भागात निर्माण होते. त्यामुळे या प्रदेशातील अस्थिरतेचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर पडतो. त्यामुळे मगागाई देखील वाढते. याचा परिणाम भारतासह जगभरातील इतर देशांवर देखील पडणार आहे. लोकांना पेट्रोल-डिझेलसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. शिवाय, वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंच्या किंमती देखील वाढतील.गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत गेल्या आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या एका बॅरेलची किंमत ९०.४५ डॉलर इतकी झाली आहे. २ जानेवारी २०२४ मध्ये एका बॅरेलची किंमत ७५.८९ डॉलर इतकी होती. युद्धाची स्थिती निर्माण झाली असल्याने तेलाच्या किंमती आणखी वाढणार आहेत. तेलाच्या आयातीवर देखील परिणाम पडणार आहे. पर्यायाने महागाई वाढणार आहे. केंद्रीय बँका त्यामुळे आपल्या दरांमध्ये घट करण्याची शक्यता कमी आहे.युद्धाला तोंड फुटल्यास भारतासाठी ही धोक्याची घंटा असेल. कारण, याचा परिणाम भारताच्या शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. भारत हा ९० टक्के कच्चे तेल आयात करणारा देश आहे. भारताकडे येणाऱ्या मालवाहतूक जहाजांवर निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अस्थिरता दिसून येऊ शकते. सध्या भारतीय शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात काय होईल याचा अंदाज बांधता येईल.
भू-राजनैतिक तणाव वाढल्याने शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली. सोन्याच्या किंमती दोन दिवसात १ हजार रुपयांनी वाढल्या आहेत. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३ हजारांच्या जवळ गेली आहे. अनिश्चिततेच्या काळात लोक संपत्ती साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. सोने त्यासाठी एक उत्तम पर्याय असतो. युद्धामुळे निर्माण झालेल्या अशांततेमुळे सोन्याच्या किंमती १.६० टक्क्यांनी वाढल्या आहेत.