महापालिकेत विकासकामाच्या नावाखाली खर्चाची उधळपट्टी ः संजय जगदाळे

कर्मचारी हित धोक्यात; सावध राहण्याचे आवाहन  

पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली खर्चाची उधळपट्टी सुरु असून त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक तिजोरीवर मोठा ताण आला आहे. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुविधा आणि लाभांवर होऊ शकतो, अशी चिंता शिव-फुले-शाहू-आंबेडकर कर्मचारी विचार मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी व्यक्त केली आहे.

जगदाळे यांनी सांगितले की, एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखली जाणारी ही संस्था आता स्मार्ट सिटीच्या गोंडस नावाखाली लुटली जात आहे. यामुळे विशेषतः गट ३ आणि ४ मधील कष्टकरी कर्मचारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांचे लाभ धोक्यात:

  • ‘धन्वंतरी’सारखी उपयुक्त योजना बंद करण्यात आली असून त्याऐवजी खर्चिक योजना लादल्या जात आहेत.

  • सेवा प्रवेश नियमांच्या कारणावरून अनेक कर्मचारी ‘दहा, वीस, तीस’ योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत.

  • घरकर्जासाठी देण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याजदर कपात करण्यात आलेली नाही.

  • सातव्या वेतन आयोगातील भत्त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

  • लाड-पागे समितीच्या निर्णयानंतरही अद्याप आवश्यक आदेश निर्गमित झालेले नाहीत.

  • पदोन्नतीसाठी जागा रिक्त असूनही कारवाई होत नाही.

  • 2005 नंतर कायम झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव 2019-20 मध्ये मंजूर झाल्यावरही तो अद्याप राबवण्यात आलेला नाही.

दुटप्पी धोरणावर टीका:
महापालिका प्रशासनाने अनेक कर्मचाऱ्यांचे अतिकालीन भत्ते रोखले असताना, ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र अतिकालीन भत्त्यांचा लाभ दिला जात असल्याची टीका जगदाळे यांनी केली. तसेच वैद्यकीय खर्चाच्या बिलांची परतफेड वेळेवर न केल्यामुळेही कर्मचारी वर्ग त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्मार्ट सिटी प्रकल्पांवर खर्च, पण कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष:
शहरात सल्लागार कंपन्या, सॅप, डीएम, संगणक प्रणाली अशा अनेक प्रकल्पांवर प्रचंड खर्च केला जात आहे. या खर्चाच्या ओघात करदात्यांचा पैसा वाया जात असून, याचा फटका थेट कर्मचारी वर्गाच्या पगार व इतर लाभांवर होतो आहे.

संघटनेचा इशारा:
जगदाळे यांनी सांगितले की, जर हे प्रकार तात्काळ थांबवले नाहीत, तर संघटना व परिषदांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रत्येक कर्मचाऱ्याने याबाबतीत जागरूक राहून महापालिकेच्या आर्थिक स्थितीचे रक्षण करण्यासाठी सजग राहावे, असे आवाहन संजय जगदाळे यांनी केले आहे.

Share

Leave a Reply