शाब्बास पोरी, रिक्षाचालकाच्या कन्येची एमपीएससी परीक्षेत उत्तुंग भरारी

पिंपरी ः  टीम न्यू महाराष्ट्र

असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे,  हा तुकोबांच्या गाथेतील अभंग आणि ज्ञानेश्वरी ग्रंथातील ओव्यांचे स्मरण तसेच नियमित दहा तासांचा अभ्यास करीत वारकरी संप्रदायातील रिक्षाचालकाच्या कन्येने एमपीएससी परीक्षेत दुहरी यश मिळवले. तिने विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही पदांना गवसणी घातली. अतिशय गरिबीच्या परिस्थितीत जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावरअवघ्या २४ व्या वर्षी तिने मिळविलेले हे यश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. 

प्रगती शिवाजी काशीद, असे या मुलीचे नाव आहे.  चिखली, मोरेवस्ती येथील वारकरी संप्रदायातील काशीद कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील माने वस्ती. घरच्या गरिबीमुळे तिचे कुटुंब चिखली मोरे वस्ती येथे स्थलांतरीत झाले. वडिल शिवाजी हे रिक्षा चालक तर आई रेणुका गृहिणी. भाऊ वैभव बी.काॅमच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे.  प्रगतीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण कृष्णानगर येथील गणगे प्रशालेत झाले. अकरावी आणि बारावी यमुनानगर येथील माॅडर्न महाविद्यालयात, तर बीएस्सी ( फिजिक्स) पिंपरीगावातील महात्मा फुले महाविद्यालयात पूर्ण केले.  इयत्ता सातवीत असताना शिष्यवृतीचे मार्गदर्शक शिक्षक संतोष लोहार आणि संजय साळुंके या शिक्षकांकडून एमपीएससी परीक्षेची माहिती आणि मार्गदर्शन मिळाले. तेव्हापासून प्रगतीने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्येय उराशी बाळगले होते.

बीएसस्सीची (फिजिक्स) पदवी घेतल्यानंतर प्रगतीने २०२० पासून एमपीएसी परीक्षेची तयारी सुरु केली. मात्र, पहिल्या प्रयत्नात अवघ्या दोन गुणांनी तिला अपयशाचा सामना करावा लागला. पण खचून न जाता तिने जिद्दीने पुन्हा तयारी सुरु केली. नियमीत पहाटे साडेपाच वाजता उठून ती अभ्यास करायची. दररोज कमीत कमी दहा तास ती अभ्यास करीत होती. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर तिला काहीसे नैराश्य आले. अशा वेळी तिने तुकाेबांच्या गाथेतील अभंग तसेच ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे स्मरण केले. यातून नैराशावर मात करण्याची शक्ती आणि अभ्यासासाठी नवी उर्जा मिळाल्याचे प्रगतीने सांगितले.

एमपीएससीची तयारी करीत असताना सुरुवातीला शाहूनगर येथील नालंदा ग्रंथालयाचा तिला आधार मिळाला. याच काळात कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.  वडिल रिक्षा चालवायचे तर आई गृहिणी असल्याने घर खर्च तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविताना वडिलांची दमछाक होताना पाहून प्रगतीला खूप वेदना होत होत्या. मात्र आई -वडिलांचे भक्कम पाठबळ मिळायचे त्यातून ती जिद्दीने अभ्यास करायची. संकट काळात मंचर येथील ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी काशीद कुटुंबाला आर्थिक सहाय्य केले. त्यामुळे प्रगतीने पुण्यातील युनिक अॅकॅडमीतून एमपीएससीची तयारी सुरु केली. प्रगतीचा आतेभाऊ व सध्या मंत्रालयात महसूल सहायक असलेले अक्षय फलफले यांचेही तिला कायम मार्गदर्शन मिळाले. तसेच सहकारी सौरभ तरळ यानेही कायम पाठबळ दिले.  नुकत्याच जाहिर झालेल्या एमपीएससी परीक्षेत प्रगतीने २५८ गुण मिळवित यश मिळविले तसेच तिची विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी पदांवर निवड झाली.

अतिशय खडतर परिस्थितीत प्रगतीने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे. या बद्दल ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे,  शिवसेना भोसरी विधानसभा उपशहरपप्रमुख नेताजी काशीद, शहर संघटक रावसाहेब थोरात यांच्यासह विविध मान्यवरांनी तिचे कौतुक केले.

शंभर घाव घातल्यानंतर जेव्ही कठीण दगड फुटतो. याचा अर्थ ९९ घाव व्यर्थ गेले असा होत नाही. त्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न करीत रहायचे हार मानायची नाही. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर यश हमखास मिळतेच. 

प्रगती शिवाजी काशीद, एमपीएससीतील यशस्वी उमेदवार.

 

Share

Leave a Reply