मुंबई; टीम न्यू महाराष्ट्र
शिवसेना (उद्धव ठाकरे) हा आमचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही माण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कधीच आघाडी धर्म पाळत नाही. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही आघाडी धर्म पाळणार नसल्याचे बोललो होतो. यासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती येथे गोविंद बागेत बोलावून बैठक घेतली.
या वेळी सकारात्मक चर्चा झाली असून, दोन दिवसांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासमवेत एकत्र बैठक होणार आहे. त्यानंतरच माढा लोकसभा मतदारसंघात कोणाला मदत करायची? याबाबत निर्णय घेऊ, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख व सातारा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी केले.शेखर गोरे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर माण मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कशी वाढवली. सत्ता मिळवूनही त्यानंतर राष्ट्रवादीने आपल्यावर कसा अन्याय केला. याबाबतची माहिती सांगण्यासाठी व तुमचे आशीर्वाद घेऊन मी बाहेर पडतोय, हे सांगण्यासाठी फलटणच्या सभेत आलो होतो. त्या वेळी गोंधळ उडाला, याबाबतची माहिती सांगितल्यानंतर श्री. पवार म्हणाले, ‘तुम्ही राष्ट्रवादीत असताना पक्षाला उभारी देत सत्ताकेंद्रे मिळवली, याची आमच्याकडे नोंद आहे.
यादरम्यान तुम्ही गुन्हेही अंगावर घेतले. पक्षासाठी एवढे करूनही तुम्हाला न्याय मिळाला नसल्याने तुम्ही नाराज होणे साहजिकच आहे; पण झाले गेले सर्व समज-गैरसमज विसरून जाऊ. पाठीमागचे काही काढू नका. आता एकत्र येऊन काम करूया. आपल्याला कोणत्याही किमतीवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. तुम्ही कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.’’ माण मतदारसंघात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन एक मेळावा घेऊया. या वेळी माझ्यासह उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा घेऊ, असेही श्री. पवार यांनी सांगतिल्याचे श्री. गोरे म्हणाले.
शेखर गोरे म्हणाले, ‘‘श्री. पवार आदर्श नेते असले, तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताच निर्णय जाहीर करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर श्री. पवार यांनी तिघांची दोन दिवसांत एकत्रित बैठक घेऊ, असे सांगितले. त्यामुळे श्री. पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीनंतर माढ्यात कोणाला मदत करायची? हा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रणजितसिंह निंबाळकरांची विनंती
माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपण निःस्वार्थीपणे मदत करत माण मतदारसंघातून मताधिक्य देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती; पण निवडून आल्यावर पाच वर्षांत त्यांना आमची एकदाही आठवण झाली नाही. आता पुन्हा २०२४ मध्ये लोकसभेचे तेच उमेदवार आहेत. पुन्हा एकदा मला मदत करा, अशी विनंती करण्यासाठी ते दहिवडी कार्यालयात बैठक सुरू असताना अचानक आले होते. या वेळी त्यांना मी शिवसेना संपर्कप्रमुख आहे अन् आमचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मी राष्ट्रवादीवर नाराज असलो, तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच येणाऱ्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहे.