नागपूर : टीम न्यू महाराष्ट्र
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे सामाजिक क्रांती केली ती दीक्षाभूमी नागपूरचीच. हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही नागपूरचेच आणि भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यस्थानी असलेले शहरही नागपूरच. अशी विविधाअंगी ओळख असलेले नागपूर सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी आले आहे. कारण येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे.
महायुतीचे नितीन गडकरी व महाविकास आघाडीचे विकास ठाकरे या दोन्ही उमेदवारांची काही बलस्थाने आणि काही उण्या बाजू असून नागपूरकर मतदारांना यातून एकाची निवड करायची आहे. गडकरी यांच्या जमेच्या बाजूंमध्ये बलाढ्य संघटनात्मक बळ, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचारातील सक्रिय सहभाग, गडकरींनी पहिल्या पाच वर्षांत शहरात केलेला पायाभूत सुविधांचा विकास, राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्थांचे जाळे. सिमेंट रस्ते, उड्डाण पूल ही दृश्य स्वरूपातील विकास कामे आदींचा समावेश होतो. या शिवाय गडकरींची स्वत:ची ‘विकास पुरुष’ अशी प्रतिमा आणि ते राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमामुळे सर्व समाजघटकांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे. याबाबी निवडणुकीत त्यांची बाजू भक्कम करणाऱ्या आहेत. दुसरीकडे कोट्यवधींची विकास कामे झाली तरी स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांची स्थिती जैसे-थे असणे, सर्वत्र सिमेंटीकरणाला नागरिकांचा असणारा विरोध, पुरामुळे झालेली लक्षावधींची हानी, त्यातून निर्माण झालेला संताप, दहा वर्षांत रोजगार निर्मितीत आलेले अपयश, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी या त्यांच्या उण्या बाजू ठरतात.
काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा नगरसेवक ते आमदार ही राजकीय कारकीर्द ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. यातूनच लोकांसाठी संघर्ष करणारा धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क, शहरातील समस्येची खडा न खडा माहिती, त्यासाठी केलेला संघर्ष, वॉर्डा-वॉर्डात स्वत:च्या कार्यकर्त्यांची फळी आणि प्रथमच एकजुटीने उभी ठाकलेली काँग्रेस आदी ठाकरेंच्या जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे काँग्रेसमधील गटबाजी, क्षीण झालेल्या पक्षसंंघटनेची मर्यादित सक्रियता आणि भाजपला जशास तसे तोंड देण्यासाठी लागणारी मर्यादित यंत्रणा या त्यांच्या उण्या बाजू ठरतात. २०१४, २०१९ या दोन्ही वेळी नितीन गडकरी यांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली होती. तिसऱ्यांदा हाच मुद्दा घेऊन ते प्रचार करीत आहे. काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी मध्यमवर्गीयांना मोठे उड्डाण पूल नको, त्यांच्या मुलांना रोजगार व महागाईपासून सुटका हवी आहे, हा प्रचाराचा मुद्दा केला आहे.
नागपूरमध्ये एकूण २६ उमेदवार रिंगणात असले तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. एरवी दलित आणि मुस्लीम मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडणारे ठरते. या निवडणुकीत ही शक्यता कमी आहे. वंचितने काँग्रेसला पाठिंबा दिला, एमआयएमचा उमेदवार नाही. बसपाचे योगेश लांजेवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी मयावती यांनी नागपुरात सभाही घेतली.मतदारसंघात तेली, माळी, कुणबी या बहुजन समाजातील प्रमुख जात समूहांची मतदारसंख्या मोठी आहे. त्याच्या खालोखाल दलित, मुस्लीम, अल्पसंख्याक आणि हलबा या समाजाची मते असून त्यांचा कल निर्णयाक ठरणारा असतो. २०१४, २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये तेली, माळी, आणि हलबा समाजाचा कल भाजपकडे होता. कुणबी समाजावर भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचा दावा आहे. २०२४ मध्ये बहुजन समाजासोबत दलित, मुस्लीम, अस्पसंख्याक समाजाची मोट बांधण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत.एकूणच नागपूरकर मतदार गडकरींच्या विकास कामांना कौल देत त्यांना तिसऱ्यांदा निवडून देतात की काँग्रेसच्या ‘विकास’ ठाकरेंना दिल्लीत पाठवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.