बारामती : टीम न्यू महाराष्ट्र
महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण हे विकसनशील भारताला विकसित भारत करण्यात महत्त्वाची भूमिका बजवेल. तसेच महिलांच्या जीवनातही बदल घडवेल असे प्रतिपादन यशश्री फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. सुप्रिया बर्गे यांनी केले.
बारामती येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन या महाविद्यालयात आयोजित महिलांचे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण या उपक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त रवींद्र थोरात, प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मंगेश फुटाणे, प्रा. सचिन सस्ते, प्रा. सचिन तावरे, अॅड. विशाल बर्गे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे यांनी महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण हे देशाच्या, राज्याच्या आणि घराच्या विकासाची गुरुकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. मानवसमूहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. छळ आणि अत्याचार हे स्त्रियांच्या प्रगतीसाठी अडसर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तर महिलांनी फक्त ‘चूल आणि मूल’ याकडेच लक्ष दिले पाहिजे असे अनेक जणांना वाटते, पण आता महिलांनी चुल आणि मुलासोबतच ‘देश आणि विदेश’ यांकडेसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. महिलांचे सक्षमीकरण हे महिलांच्या सुरक्षिता आणि प्रगती करता आवश्यक असल्याचे अॅड. सुप्रिया बर्गे यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पूनम केवटे यांनी केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाटी संस्थेचे उपाध्यक्ष केशवबापू जगताप, विश्वस्त वसंतराव तावरे, रामदास आटोळे, रवींद्र थोरात, महेंद्र तावरे, गणपत देवकाते, अनिल जगताप, चैत्राली गावडे, सीमा जाधव तसेच संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांचे विशेष सहकार्य लाभले.