पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आज (ता. २३) पाऊस पडेल असा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे गारपीट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, पालघर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी हवामानाचा कोणताही इशारा नाही. राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, वरील चक्राकार वारे, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २३) विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात वाशीम येथे उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान ४० अंशांच्या पार असून, तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाल्याने वाशीम येथे उष्णतेची लाट आहे. अकोला, धुळे, गडचिरोली, वर्धा येथे तापमान ४२ अंशांच्या वर आहे.