तुमचे एक मत इतिहास घडवेल -आदित्य ठाकरे

पिंपरी; टीम न्यू महाराष्ट्र

देशात ते चारशेपार म्हणत असले, तरी भाजप दोनशे देखील पार करणार नाही. भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्र व्देष करणा-यांना मतदान करायचे नाही अशी भूमिका आज मतदार घेत आहेत. तुमचे एक मत इतिहास घडविणारे आणि देशातील सरकार बदलणारे ठरणार आहे. देशातील अंधकार दूर करण्यासाठी मावळ लोकसभेतून मशाल चिन्हासमोरील बटण दाबून संजोग वाघेरे यांना विजयी करा, असे‌ आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज, मंगळवारी दाखल करण्यात आला. त्यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभेला संबोधित केले. त्यामुळे आदित्य ठाकरे बोलत होते. मावळ लोकसभेत संजोग वाघेरेंना विजयी करण्याची जबाबदारी मतदारांनी घेतलेल्याचे सांगत आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा जनतेची आणि कार्यकर्त्यांची काळजी घेतली पाहिजे, हा विचार घेऊन पुढे जातो. देशात परिवर्तन होणार आहे. भाजपचे सरकार परत येणार नाही. अबकी बार‌, भाजपा तडीपार करण्याची गरज सर्वांच्या लक्षात आलेली आहे.

युवकांचे रोजगार हिरावले. गद्दारांच्या सरकार आल्यावर एकही नोकरीची संधी आलेली नाही. गुजरातला विरोध नाही, पण महाराष्ट्र, आसाम, केरळ, मणिपूर सर्वांना हक्काचे जे असेल ते मिळाले पाहिजे. ज्या राज्यात गुंड मंत्रालयात रील काढतात. तिथे कोणाला सुरक्षित वाटत नाही. बलात्कार करणाऱ्या प्रत्येकाला फाशी झाली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आपल्याला आहे. मात्र, भाजपकडून बलात्का-यांना वाचविण्याचे काम केले जाते. महिला वर्ग भाजपला मतदान करणार नाही. महागाईमुळे गरिबांना जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी, महिला, युवा, गरिब या वर्गाला देशोधडीला लावण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले. कृषीमंत्र्याचे नाव देखील माहित नाही. पुढचे पाच वर्षे हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या सरकार असताना कर्जमाफी दिली. भाजपने शेतकऱ्यांवर लाठ्या-काठ्या चालविल्या, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आमदार सचिन अहिर म्हणाले, मावळ लोकसभेचा संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेली गर्दी भाड्याची नाही. त्यांच्यावरील प्रेमापोटी आलेली आहे. लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील यांचा विजय यावरून निश्चित झालेला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पाटील म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघ घाटमाथा आणि घाटाखाली दोन भागात आहे. घाटावर संजोग वाघेरे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी आहे. तशीच घाटाखालच्या तीन्ही विधानसभा मतदारसंघातून आम्ही आहोत. तिकडून सर्वाधिक लीड संजोग वाघेरे पाटलांना देवू, असे आश्वासन आमचे आहे.

सुज्ञ जनता ठाकरेंबरोबर: माणिकराव ठाकरे
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले, पहिल्या फेरीत विदर्भाच्या पाच जागांमध्ये हवा महाविकास आघाडीच्या बाजुने आहे. पाचही जागा जिंकणार आहोत. देशात ज्या पद्धतीने राजकारण भाजपने केले. धर्माच्या, जातीच्या नावाने लोकांना फसवले जात आहे. देशात इंडिया आघाडीला सत्तेवर आणण्याचे जनतेने ठरवले आहे. सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत पक्ष फोडला, चिन्ह चोरले हे भाजपने घडवून आणले. परंतु जनता सुज्ञ असून ते ठाकरेंबरोबर आहे. तेच निवडणुकीत त्यांना उत्तर देणार आहेत. मशाल चिन्हासमोरील बटण दाबून संजोग वाघेरेंना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

मावळमध्ये मशाल पेटवा : डॉ. अमोल कोल्हे
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शिवसैनिक निखा-यासारखा असतो. तो पेटून उठला, तर‌ तो विजत नाही. आदिलशाहीला न जुमानता वतनावर पाणी सोडून कान्होजीराजे जैधे स्वराज्यासोबत राहिले. म्हणून त्यांच्या निष्ठेचा इतिहास सांगितला जातो. हनुमानाने शेपटीची मशाल करून रावणाची लंका दहन करण्याचे काम केले. जो कोणी देशाला मातृभूमी मानतो. त्या सर्वांची ही निवडणूक आहे. या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून गद्दारी गाडण्यासाठी मावळ लोकसभेत मशाल पेटवा, असं आवाहन त्यांनी केले

गद्दारांना धडा शिकवा : रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण सर्व एकत्र आहोत. मावळच्या भूमीने कायम स्वाभिमान राखला. तोच या निवडणुकीत राखणार आहेत. गद्दारांना धडा शिकविण्यासाठी आणि भाजपला जागा दाखविणारी ही लढाई आहे. कोणी काही सोयीचे राजकारण केले, तरी आपण निष्ठा सोडणार नाही‌. भाजपने २०१४ नंतर कंपन्या आणल्या नाहीत. पण, हक्काचा उद्योग गुजरातमध्ये गेला. इथल्या खासदारांनी काय केले ? एकजुटीने आपलं ठरलंय, संजोग वाघेरे यांना खासदार करायचंय, असा नारा देत संजोग वाघेरेंना शहरातून तीन लाखांचे मताधिक्य द्या, असे आवाहन रोहित पवारांनी केले.

———————

रॅलीच्या निमित्ताने उपस्थित जनसमुदाय पाहून गद्दारी करणाऱ्यांना जनता गाडून टाकणार आहे, हे निश्चित झालेले आहे. आपण सर्व जण मिळून या निवडणुकीत पक्षाला आणि उद्धव साहेबांना यातना देणा-यांचा बदला घेणार आहोत. त्यांना त्यांची जागा दाखवून देवू. जे दहा वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघात झाले नाही, ते काम पुढच्या पाच वर्षांत करून दाखवू.

संजोग वाघेरे
उमेदवार , महाविकास आघाडी

Share

Leave a Reply