शहराची जागतिक ओळख नाकारणाऱ्या आयुक्तांचे विधान बेजबाबदार; आयुक्तांना आमदारांनी सुनावले
महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला
पिंपरी, ३१ मार्च २०२६ : “पिंपरी-चिंचवड हे शहर श्रमिकांच्या कष्टातून आणि भूमिपुत्रांच्या त्यागातून जागतिक नकाशावर तळपत आहे. अशा शहराच्या जागतिक ओळखीबद्दल शंका उपस्थित करणे, हा येथील नागरिक आणि संस्कृतीचा अवमान आहे. आयुक्तांनी शहराची ओळख शोधण्यापेक्षा महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणावी आणि प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे. शहराच्या अस्मितेचा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही,” अशा शब्दांत आमदार शंकर जगताप यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा समाचार घेतला.
नवनियुक्त आयुक्तांनी शहराच्या जागतिक ओळखीबाबत केलेल्या एका विधानाचे वृत्त समाजमाध्यमे आणि वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झाले. या विधानावर आमदार जगताप यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शून्यतून विश्व निर्माण करणाऱ्या शहराचा अवमान
आमदार शंकर जगताप म्हणाले की, “पिंपरी-चिंचवडने शून्यातून विश्व निर्माण करून जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. हे शहर संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेले असून चापेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानाने घडलेले आहे. अशा पवित्र भूमीबद्दल ‘जगात कोणी ओळखत नाही’ असे विधान करणे, हे अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदार आहे.”
प्रगतीचे ‘इंडस्ट्रियल इंजिन’
शहराच्या औद्योगिक प्रगतीचा पाढा वाचताना ते पुढे म्हणाले, “आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनत असताना, पिंपरी-चिंचवडने या प्रगतीत ‘इंडस्ट्रियल इंजिन’ म्हणून मोठी भूमिका बजावली आहे. टाटा, मर्सिडीज बेंझ आणि फोक्सवॅगन सारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांमुळे आज आपली ओळख सातासमुद्रापार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहराला ‘आयटी हब’ आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी जे बळ दिले, त्यामुळेच आज हे शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकत आहे.”
प्रशासकीय प्रमुखांकडून इतिहासाची थट्टा दुर्दैवी
“हे वैभव इथल्या कष्टकरी आणि भूमिपुत्रांच्या त्यागातून उभे राहिले आहे. प्रशासकीय प्रमुखाच्या खुर्चीवर बसून शहराच्या गौरवशाली इतिहासाची आणि प्रगतीची थट्टा करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आयुक्तांच्या या विधानामुळे उद्योजक, तरुण पिढी आणि सामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शहराची ओळख पुसण्याचा किंवा येथील भूमिपुत्रांच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
