विधानपरिषदेची उमेदवारी डावलल्याने पिंपरीचे शहराध्यक्ष, माजी आमदार नाराज
पिंपरी, १ जून : विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे नाराज झाले आहेत. आर्थिक निकष पाहून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप लांडे यांनी केला, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नवख्या आहेत. अजितदादा गेल्याची जखम मोठी होती. आता संधी डावल्याची जखम झाली असल्याचे सांगून बहल यांनी नाराजी बोलून दाखविली.
पिंपरी-चिंचवड शहर एके काळी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होते. परंतु, २०१७ मध्ये हा बालेकिल्ला उध्वस्त झाला. २०१७ आणि २०२६ अशी भाजपची सलग दुसऱ्यांदा महाापलिकेवर सत्ता आली आहे. भाजपचे विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे शहरात चार आमदार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले अण्णा बनसोडे हे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला आव्हान देण्यासाठी, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शहरातील पदाधिकाऱ्याला विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी स्थानिकांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्याकडे केली होती. माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे विधानपरिषद उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु, पिंपरीऐवजी पुण्यातील उमेदवार देण्यात आला. त्यामुळे इच्छुकांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली.
शहराध्यक्ष बहल म्हणाले, ‘दिवंगत अजित पवार यांच्याबरोबर ३४ वर्षांपासून एकनिष्ठपणे काम केले. पिंपरी मतदारसंघ राखीव असल्याने विधानसभा निवडणूक लढविता आली नाही. सर्व वस्तुस्थिती पक्षश्रेष्टींना सांगितली होती. वरिष्ठ असल्याने माझी दावेदारी प्रबळ होती. शंभर टक्के उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, मोठा भ्रमनिरास झाला असून तीव्र नाराज आहे. आता काही निर्णय घेणे चुकीचे होईल. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या निर्णयाबरोबर राहणार आहे. पक्षश्रेष्टींच्या वेगळ्या अडचणी असू शकतात’.
—————————————
‘पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची नाळ तुटायला लागली
विलास लांडे म्हणाले, ‘पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची नाळ तुटायला लागली आहे. अजितदादांच्या निधनामुळे आम्ही हतबल असून आमच्या पाठीमागे कोण राहिले नाही. प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळायला पाहिजे होती. विक्रम काकडे कोणत्या खाणीतील हिरा आहे हे माहिती नसून पक्षाने शोधून काढला आहे. आर्थिकदृष्ट्या ताकदवान असल्याने त्यांना उमेदवारी दिली आहे’.
