गॅस अभावी कामगारांवर उपासमारीची वेळ; चाकण सोडून गावची वाट धरली!
चाकण, 7 एप्रिल २०२६ : चाकण औद्योगिक परिसरात गॅस सिलींडरच्या तीव्र टंचाईमुळे रोजंदारीवर जगणार्या कामगारांसमोर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. गॅस मिळत नसल्यामुळे अनेक कामगारांपुढे आता रहायचे कसे आणि जगायचे कसे अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातच औद्योगिक क्षेत्रातील बहूतांशी कंपन्यानाही व्यावसायिक सिलींडरची टंचाई भेडसावत असल्याने त्यांनी शिफ्ट कमी केल्या आहेत. याचा परिणाम अनेक कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. सध्या शाळांनाही उन्हाळी सुटी लागत आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीत कामगार वर्गाने कुटूंब कबिल्यासह चाकण सोडून आपापल्या गावाकडे परतण्यास सुरुवात केली आहे.
चाकण औद्योगिक परिसरात हजारोंच्या संख्येने मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे परिसरात मध्यमवर्गीय आणि कामगार कुटुंबांची संख्या मोठी आहे. राज्यातील तसेच राज्याबाहेरील कामगार वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. स्थानिकांनी दोन ते तीन मजली चाळी बांधल्या आहेत. या चाळींमध्ये खोल्या भाड्याने घेऊन कामगार राहतात. काही जण कुटूंबासह राहतात. तर, काही तीन ते चार जण मिळून एका खोलीत रूम पार्टनर म्हणून राहतात. यापैकी अनेकांकडे अधिकृत गॅस कनेक्शन नसल्याने ते दोन किंवा पाच किलोचे छोटे सिलींडर वापरण्यावर भर देतात.
आखाती देशांमधील सुरू असलेल्या युद्धामुळे सगळीकडेच गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक सिलिंडर मिळविण्यासाठी गॅस वितरकांच्या दुकान, गोदामाबाहेर रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पंधरा दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शहरातील अनेक खानावळी, हॉटेल, बेकरी, वडापाव हातगाडी व्यावसायिकांवर गॅसअभावी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र, गॅस टंचाईचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य कामगार वर्गाला बसत आहे. हातावर पोट असणार्या या कामगारांसमोर सिलींडरअभावी उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. छोट्या सिलींडरचा भाव आवाक्याबाहेर गेल्याने या कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी चुली पेटवण्याचा पर्याय स्वीकारला. त्यासाठीही लाकूड किंवा कोळसा शोधण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा परिस्थितीत लाकूड वखार आणि कोळसा विक्रेत्यांनीदेखील दरवाढ केली आहे. त्यामुळे कामगार हतबल झाले आहेत.
व्यावसायिक सिलींडर केवळ रूग्णालये, कॉलेज हॉस्टेल, आश्रमशाळा यांना प्राधान्याने दिले जात आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील बहूतांशी कंपन्यानाही व्यावसायिक सिलींडरची टंचाई भेडसावत आहे. कच्च्या मालाचा पुरवठा होत आहे. परंतु, सिलींडर मिळत नसल्याने त्याचा उत्पादनावर परिनाम झाला आहे. त्यामुळे बहूतांशी कंपनी व्यवस्थापनाने कामाच्या शिफ्ट कमी केल्या आहेत. याचा परिणाम अनेक कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळेही कामगार वर्ग चिंतेत आहे. सध्या शाळांनाही उन्हाळी सुटी लागत आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीत खर्चिक जीणे जगण्यापेक्षा कामगार वर्गाने कुटूंब कबिल्यासह चाकण सोडून आपापल्या गावाकडे परतण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चाकण औद्योगिक परिसरात भाड्याच्या खोल्या ओस पडायला लागल्या आहेत. यामुळे घरमालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. एकीकडे भाडे बंद झाले, तर दुसरीकडे खर्च कायम असल्याने घरमालक अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी कर्ज काढून खोल्या बांधल्या आहेत. आता त्या रिकाम्या होऊ लागल्याने आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही प्रशासन आणि गॅस पुरवठा यंत्रणा यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
“चाकण परिसरात गोरगरीब कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. त्यातच कंपन्यांनाही व्यावसायिक सिलींडर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने कंप्ानी व्यवस्थानाने शिफ्ट कमी केल्या आहेत. याचा परिणाम कामगारांचे काम कमी होण्यावर झाला आहे. त्यातच लॉकडाऊन लागण्याचीही अफवा काही दिवसांपासून पसरत असल्याने कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक कामगार घर सोडून गावी परतू लागले आहेत.”
– दिलीव बटवाल (सीईओ – फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज)
