मुंबई; टीम न्यू महाराष्ट्र
सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची माहिती संबंधित विधिज्ञांना पाठवली जाणार आहे. यामुळे कागद आणि वेळेची बचत होईल. सवोच्च न्यायालयाने डिजिटायझेशनच्या दिशेने मोठे पाउल टाकले आहे.
न्यायालयाचे बहुतांश काम डिजिटल करण्याच्या दृष्टीने देशभर प्रयत्न सुरु आहेत. मागील वर्षी ई फायलिंग सेवा सुरु केली. त्याद्वारे नागरिकांना वकिलांच्या माध्यमातून आपले खटले ऑनलाईन माध्यमातून दाखल करता येतात. त्यासोबतच न्यायालयांचे कामकाज ऑनलाईन केले जात आहे. तसेच न्यायालयाचे न्याय निवाडे, निकाल आणि आदेश देखील संकेतस्थळांवर दिले जात आहेत. त्यामुळे न्याय व्यवस्थेचे डिजिटायझेशन होत आहे.
त्यातच सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक मोठी सुधारणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) सर्व्हिसेस सोबत व्हाटसअपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयात ज्या वकिलांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते त्यांना संबंधित खटल्याची सुनावणी कधी होईल, तो खटला कधी दाखल करण्यात आला, महत्वाचे आदेश आणि निकाल यांचा तपशील व्हाट्सअप वर पाठवला जाणार आहे. बार कौन्सिलच्या सर्व सदस्यांना देखील रजिस्ट्रीच्या माध्यमातून हे संदेश पाठवण्यात येणार आहेत.
एखाद्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचा तपशील व्हाट्सअपवरून पाठवला जाणार आहे. यामुळे न्यायालयाचा वेळ आणि कागद वाचेल. अधिकाधिक लोकांपर्यंत न्यायालय पोहोचेल. दुर्गम भागातील लोकांना देखील सहज ऍक्सेस मिळेल. जिव्हाळ्याचे विषय नागरिकांना तात्काळ समजतील.