पुणे – कात्रज, कोंढवा आणि खडी मशिन चौक परिसरात होणाऱ्या अपघातांमुळे शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली असून विशिष्ट वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
मंगळवारपासून (दि.9) हे बदल लागू करण्यात आले आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्टेट बॅंक चौक ते शत्रुंजय मंदिर चौक- पुंडलिक टिळेकर नगर चौक ते खडी मशिन चौक हा रस्ता सर्व वाहनांसाठी एकेरी वाहतूक मार्ग करण्यात आला आहे. खडी मशिन चौक- श्रीराम चौक- इस्कॉन मंदिर चौक ते स्टेट बॅंक चौक हा रस्ता एकेरी वाहतूक मार्ग करण्यात आला आहे.
शत्रुंजय चौकापासून उजवीकडे वळण घेऊन कात्रजकडे जाण्यासाठी प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग- शत्रुंजय चौकातून डावीकडे वळण घेऊन धारिवाल शाळेसमोरून उजवीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जावे. इस्कॉन मंदिर चौक आणि अहिल्यादेवी नगर येथून उजवीकडे प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग- इस्कॉन मंदिर चौकातून डावीकडे वळण घेऊन स्टेट बॅंक चौकातून उजवीकडून पुढे जावे.
कात्रजकडून येवलेवाडीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी खडी मशिन पोलिस चौकीजवळ उजवीकडे वळण घेऊन श्रीराम चौकामधून खडी मशिन चौकातून उजवीकडे वळण घेऊन जावे. टिळेकर नगर येथून खडी मशिन चौक, येवलेवाडी, कात्रजकडे जाण्यासाठी टिळेकर नगर चौकातून डावीकडे वळून खडी मशिन चौकातून श्रीराम चौक मार्गे जावे. खडी मशिन पोलिस चौकी ते श्रीराम चौकदरम्यान सर्व जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.
वडाची वाडी ते उंड्री चौक मार्गावर सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत. वडाची वाडी ते आंबेकर चौक (जगदंबा भवन रस्ता) मार्गावरून सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत.